कोल्हापूर : गेल्या वर्षाच्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये प्रश्नी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी बैठकीत किती दर देणार यासंंबंधी चकार शब्द न काढता मौन पाळले. कारखानदारांच्या बाजूने साखर तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी पूर्ण बैठकीत ४०० रूपये कसे देता येत नाही, असे पटवून दिले. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ४०० रूपये कसे देता येते, हे आकडेमोड करून सांगितले. मात्र कारखानदारांनी पैसे देण्यासंबंधी भूमिका उघड केली नाही. यामुळे शेवटी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर मैदानात घनघोर संघर्ष होईल, असा इशारा दिला.
आम्ही वाढीव ४०० रुपये कसे देता येतील ह्याचे गणित करून दाखविले व्यवस्थितपणे समजवून सांगितले त्यात इथेनॉलचा अधिकचा नफा आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे यातील तफावत दाखवून दिली. परंतु यात कारखानदारांनी कोणताही दुजोरा दिला नाही आणि आपली भूमिका उघड केली नाही. शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर आम्ही मैदानात उतरू असा इशारा दिला. - राजू शेट्टी अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना