पुणे : दोन वर्षापासून सरकारकडून शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध होत असल्याने हा दौरा रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली होती.
मात्र, यंदा यासाठी अर्थसंकल्पातच २ कोटी रुपयांची तरतूद केल्याने परदेश दौऱ्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, सर्व जिल्ह्यांमधून १७० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यांची संधी मिळणार आहे.
यंदा प्रथमच महिलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांसह एक महिलेचे नाव ५ ऑगस्टपर्यंत कळवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दोन कोटी रुपयांची तरतूद
◼️ राज्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याचा लाभघेता यावा, यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते.
◼️ मात्र, ही तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी अर्थात मार्च महिन्यात उपलब्ध करून दिली जात असल्याने कृषी विभागाला आतापर्यंत शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठवता आले नाही.
◼️ यंदा राज्य सरकारने अर्थसंकल्पातच २ कोटींची तरतूद केली. त्यातील १ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चाची परवानगी मिळाली.
पाच शेतकऱ्यांत एक महिला असणार
◼️ कृषी आयुक्तालयाने याबाबत सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ शेतकऱ्यांची निवड करण्याचे निर्देश दिले आहेत.
◼️ त्यातील ३ शेतकरी सर्वसाधारण गटातून, तर एक शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमधून निवडावा. तर एक शेतकरी महिला असावी.
◼️ ही पाचही नावे येत्या ५ ऑगस्टपर्यंत आयुक्तालयाला पाठवावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
◼️ त्यामुळे राज्यातून एकूण १७० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
◼️ त्यात प्रत्येकी ३४ महिला आणि पुरस्कारप्राप्त शेतकरी असतील, अशी माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली.
महिला शेतकऱ्यांनाही योजनेत सहभागी होता येणार
◼️ यंदा युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे.
◼️ यापूर्वी शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा २५ ते ६० असावी, असे निकष होते.
◼️ आता किमान शिक्षणाची व कमाल ६० वर्षे ही वयाची अट रद्द करण्यात आली आहे.
◼️ शेतकऱ्याचे किमान वय २५ असावे लागणार आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
अधिक वाचा: आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातच नोकरदार भावाने सर्व जमीन केली शेतकरी भावाच्या नावावर