बचत गटांच्या चळवळीने जिल्ह्यात चांगला जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार १५५ स्वयंसहायता समूह गट (बचत गट) कार्यरत असून यापैकी ५३३ बचत गटांना खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपयांची रक्षाबंधनाची भेट देण्यात आली आहे.
'उमेद' अभियानांतर्गत बचत गट, उत्पादक गट, ग्रामसंघ व प्रभाग संघांना वर्षाला दोन टप्प्यात खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, स्टार्टअप निधी दिला जातो. यापूर्वी मे-जून महिन्यांत पहिला टप्प्याचे वितरण करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात परवा ८ कोटींचा हप्ता प्राप्त झाला.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सहायक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५३३ बचत गटांना खेळते भांडवल, तसेच २८ ग्रामसंघांना जोखीम निधी (व्हीआरएफ), प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ४९ उत्पादक गटांना खेळते भांडवल व पायाभूत सुविधांसाठी, ६० ग्रामसंघ आणि ३४ प्रभाग संघांना व्यवस्थापन निधीचे वितरण करण्यात आले.
या निधीत केंद्र सरकारचा ६० व राज्य सरकारचा ४० टक्के वाटा आहे. उर्वरित १ कोटी रुपयांचे वितरणही या आठवड्यात केले जाणार असल्याचे अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
उत्पादक गटांत कोणते व्यवसाय
• शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धउत्पादन, आद्रक, मका, कापूस उत्पादन करणाऱ्या बचत गटांतील महिलांचा मिळून उत्पादक गट तयार केला जातो.
• छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असे १२७ उत्पादक गट आहेत. उत्पादक गटांना स्टार्ट निधीपोटी ३.५ लाख रुपये दिले जातात. त्याची परतफेड करण्याची गरज नसते.
• याशिवाय, या गटांना ५ लाखांचा निधी दिला जातो. त्यातील ४ लाखांचे खेळते भांडवल असून त्याची ७टक्के व्याजाने परतफेड करावी लागते, तर १ लाखाचा निधी परतफेड करावा लागत नाही.