Join us

'एफआरपी'चे ४४० कोटी अडकले; साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:46 IST

Sugarcane FRP 2024-25 जुलै महिना उजाडला तरीही जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देत नाहीत.

सोलापूर : जुलै महिना उजाडला तरीही जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देत नाहीत. नऊ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे तब्बल ९२ कोटी ७२ लाख रुपये अडकले आहेत.

मागील १५ दिवसांत १२ कोटी रुपये कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. चार महिन्यांवर पुढचा साखर हंगाम आला असला तरी साखर कारखानदार मागील हंगामात ऊस आणलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास तयार नाहीत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखानदार एफआरपी देऊ शकले नाहीत. उसाचे पैसे थकविणाऱ्या जिल्ह्यातील नऊपैकी आठ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली असली तरी साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे धाडस जिल्हाधिकारी कार्यालयाने केले नाही.

ठोस कारवाई होत नसल्याने साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देत नसल्याचे चित्र आहे. १५ जून रोजी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १०५ कोटी १२ लाख रुपये देणे होते ते ३० जूनपर्यंत म्हणजे १५ दिवसांत १२ कोटी ४० लाख रुपये दिल्याने ९२ कोटी ७२ लाख रुपये देणे शिल्लक राहिले आहे.

जयहिंद शुगर २५०६ लाख, सिद्धेश्वर साखर कारखाना २३५९ लाख, गोकुळ शुगर १७२२ लाख, श्री पांडुरंग श्रीपूर ५८७ लाख, सिद्धनाथ शुगर तिर्हे ५६९ लाख, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट ५३८ लाख, इंद्रेश्वर शुगर बार्शी ४६४ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे वाडीकुरोली पंढरपूर ४०५ लाख व भीमा टाकळी सिकंदर १२६ लाख रुपये शेतकऱ्यांचे ऊस बिल एफआरपीप्रमाणे देऊ शकले नाहीत.

शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात अवघ्या दोन साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे ७६४ लाख अडकले आहेत धाराशिव शुगर चोराखळी या कारखान्यांकडे ९९ लाख तर जुना भाऊसाहेब बिराजदार उमरगा या साखर कारखान्याने ६६६ लाख रुपये एफआरपीचे देणे आहे.

राज्यात ६८ कारखाने ४४० कोटी थकलेराज्यात मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या २०० पैकी १३२ साखर कारखान्यांनी एफआरपी व त्याहीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र ६२ साखर कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक, तीन कारखानदारांनी साठ टक्क्यांपेक्षा कमी तर तीन कारखान्यांनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या २८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे.

अधिक वाचा: राज्यात सर्वात जास्त दर देणारा माळेगाव कारखाना यंदा किती ऊस गाळप करणार?

टॅग्स :ऊससाखर कारखानेसोलापूरधाराशिवशेतकरीशेती