Pune : मधमाशी ही पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक असून मधमाशी पालन करणे काळाजी गरज बनली आहे. रासायनिक खतांचा वापरामुळे मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे. पण मधमाशीपालन वाढावे आणि शेतकऱ्यांनी याला व्यवसाय म्हणून स्विकारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्राची मधमाशीपालनाची वाटचाल
राज्यामध्ये मधुमक्षिकापालनामध्ये राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली, खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, मध संचालनालय, महाबळेश्वर, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे या संस्था काम करत आहेत. राज्यात ११४ इतके मधपाळ नोंदणीकृत असून त्यांचेकडे १४ हजार १६८ इतक्या मधुमक्षिका वसाहती आहेत.
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान राबविण्याकरिता महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळयांना राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळालेली आहे.
सन २०२३-२४
राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये १४ लाख निधी खर्च करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी जिल्ह्यांमार्फत १ राज्यस्तरीय परिसंवाद, ४ जिल्हास्तरीय परिसंवाद, ४ राज्यांतर्गत प्रशिक्षण व १ राज्याबाहेरील प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक, सातारा, लातूर, अमरावती, नागपूर, यवतमाळ, पालघर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यात राबविण्यात आले आहेत.
सन २०२४-२५
> सन २०२४-२५ मध्ये या योजने अंतर्गत एकूण १ कोटी ३९ लाख १६ हजारांचे प्रस्ताव राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांना सादर करण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ०७ लाख ५८ हजारांचे प्रस्ताव मंजूर होऊन सदर कार्यक्रम राज्यात राबविण्यात आला.
> यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या २० जिल्ह्यात १ ालाख ७५ हजार प्रति जिल्हा याप्रमाणे राज्यांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले.
> तसेच, ४ राज्याबाहेरील प्रशिक्षण कार्यक्रम एकीकृत मधुमक्षिकापालन विकास केंद्र, रामनगर, कुरुक्षेत्र, हरियाणा व एकीकृत मधुमक्षिकापालन विकास केंद्र, सिद्दीपेट, तेलंगणा यांच्या सहयोगाने औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले आहेत.
> तसेच, प्रकल्प आधारित घटकाचे एकूण ६ प्रकल्प प्रस्ताव मंजूर झाले असून सदर प्रकल्प संबंधित कृषी विज्ञान केंद्र व संबंधित प्रवर्तक यांचे स्तरावर प्रगतीत आहेत.