कुक्कुटपालनामध्ये आजारांचे संक्रमण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक मनुष्यप्राणी होय. दररोज कळत-नकळत त्यांचा संपर्क आजारांच्या स्रोतांशी येत असतो आणि असे व्यक्ती आजार संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.
त्यामुळे पक्षीगृहाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी काटेकोरपणे जैवसुरक्षेचे Poultry Biosecurity नियम पाळावे. जैवसुरक्षा राखण्यासाठी स्वतःच्या कोंबडी शेडचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करावे; जेणेकरून आजारांना दूर ठेवता येईल.
जैवसुरक्षेसाठी उपाय
- पक्षीगृहाचे शेड बांधताना त्यात कुरतडणारे/सरपटणारे प्राणी, परसातील/जंगली पक्षी येऊ शकणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- पाळीव प्राणी, कुत्रे व मांजरी यांना शेडपासून दूर ठेवावे.
- शेडमधील घाण व सांडलेले खाद्य वेळीच स्वच्छ करावे.
- एकात्मिक कीटक नियंत्रण सारखी उपाययोजना करून कीटकांवर नियंत्रण मिळवावे.
- शेड पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक करता येतील अशा उपाययोजना करावा.
- विनाकारण लोकांना शेडमध्ये प्रवेश देऊ नये. भेटी देणाऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात.
- कामगारांना घालण्यासाठी वेगळे कपडे, पादत्राणे, मोजे, हातमोजे, टोपी आणि मास्क द्यावेत.
- शक्यतो वाहनांना प्रवेश देऊ नये. प्रवेश द्यावयाचा झाल्यास प्रवेश करताना व बाहेर पडताना त्यांना निर्जंतुक करावे. वाहनांना शेडपासून लांब उभे करावे.
- शेडमध्ये वापरात येणारी खाद्याची, पाण्याची भांडी व इतर साधने ठराविक कालावधीनंतर स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावीत.
- काम करणाऱ्या कामगारांनी परसातील पक्षी, जंगली बदके, कोंबड्यांचे विक्रीचे ठिकाण इत्यादींच्या संपर्कात येणे शक्यतो टाळावे.
- पक्षी विकत घेताना निरोगी व उत्तम वंशावळीची घ्यावीत. शक्यतो शेडमध्ये एकाच वेळी पक्षी आणावे.
- एकाच वेळी सर्व पक्ष्यांची विक्री करावी. असे शक्य नसल्यास वयोगटानुसार पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे.
- पक्षी हाताळताना लहान, तरुण व वयस्क असा क्रम ठेवावा.
- पक्ष्यांना समतोल खाद्य, स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध असावे. खाद्य व पाण्यातून आजार संक्रमित होणार नाहीत याची खात्री करावी.
- गादीसाठी वापरण्यात येणारे तूस/भुसा चांगल्या प्रतीचा असावा. पक्षी काढल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
- नवीन पक्षी टाकण्याआधी शेडचे आणि उपयोगात येणाऱ्या साधनांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
- पक्ष्यांवर बारीक नजर ठेवून रोज निरीक्षण करावे. एखाद्या पक्ष्यात आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकास बोलवावे.
- आजाराचे निदान लवकरात लवकर करून आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्या.
- आजारी पक्षी वेळीच काढून इतर निरोगी पक्ष्यांना संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मरतुकीची पक्ष्यांच्या योग्य विल्हेवाट लावावी.
अधिक वाचा: कुक्कुटपालन व्यवसायात गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य उपलब्ध होण्यासाठी आल्या ह्या मार्गदर्शक सूचना