lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न

‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न

Black Australorp' chicken is increasing farmer's income | ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न

‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न

नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी परसबागेत ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ ही सुधारित कोंबडी पाळताना दिसत आहे. त्यातून त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.

नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी परसबागेत ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ ही सुधारित कोंबडी पाळताना दिसत आहे. त्यातून त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांतील  शेतकरी परसबागेतील कुक्कुटपालनासाठी आता ऑस्ट्रेलियन वंशाच्या ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ सुधारित  कोंबड्या पाळून आपले उत्पन्न वाढवित आहेत. मांस आणि अंडी उत्पादन या दोहोंसाठी हा पक्षी फायदेशीर ठरत असल्याने शंभरावर शेतकऱ्यांनी या प्रजातीला पसंती दिली आहे. कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या माध्यमातून या जातीच्या कुक्कुटपालनाचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे.

पारंपरिक गावठी कोंबडी वर्षाला केवळ ५० ते ७० अंडी देते. तसेच तिचे एक किलो वजन होण्यास सुमारे ७ ते ८ महिने लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो. त्या तुलनेत ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ वर्षभरात १२० ते १४० अंडी देते, तसेच अडीच ते तीन महिन्यातच सव्वा किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची होते. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढविण्याचा पर्याय म्हणून शेतकरी या कोंबडीला पसंती देत असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यक शास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी दिली.

मागील दोन वर्षात मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषत: आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी पालनाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिक प्रकल्पाद्वारे देण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या प्रकारच्या कुक्कुटपालनाकडे वाढताना दिसत आहे.

सन १९९४मध्ये स्थापन झालेल्या येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आजतागायत विविध संशोधन, प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गावठी कोंबड्यांना पर्याय म्हणून सुधारित वनराज, गिरिराज, ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ यासारख्या सुधारित गावठी कोंबडीपालनाचा प्रात्यक्षिक प्रकल्प त्याच मार्गदर्शनाचा एक भाग आहे. २००७ पासून आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे १०९ गावांमधील शेतकऱ्यांनी येथून कुक्कुटपालनाचे मार्गदर्शन घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्पची वैशिष्ट्ये :

  • काळा रंग असला, तरी डोक्यावरचा तुरा लाल रंगाचा असतो.
  • ही ऑस्ट्रेलियन वंशाची सुधारित गावठी कोंबडी आहे.
  • परसबाग आणि पोल्ट्री फार्म (बंदिस्त) दोन्ही प्रकारे उत्तम वाढ होते.
  • परसबागेत पालन केल्यास अडीच महिन्यात सव्वा किलो किंवा त्यापेक्षाही जास्त वजन होते.
  • साडेचार ते पाच महिन्याचा पक्षी झाला की अंडी देणे सुरू करतो. पुढे वर्षभरात १२० ते १४० अंडी देतो.
  • दोन ते अडीच महिन्यात मांसासाठी वापरता येते. मांसाची चवही रुचकर असते.
  • कडकनाथ कोंबडीप्रमाणे हिचा रंग काळा असला, तरी मांस आणि रक्ताचा रंग लालसर असल्याने चिकनप्रेमीही या कोंबडीला पसंती देतात.
     

शेतकरी व बचतगटाच्या महिलांना सक्षम करण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित गावठी कोंबडीपालनाचे प्रात्यक्षिक, मार्गदर्शन मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राकडून दिले जाते. शेतकऱ्यांना देण्यापूर्वी या पक्षाचे २१ दिवस शास्त्रीय संगोपन व लसीकरण करून पिले देण्यात येतात. 
डॉ. नितीन ठोके
वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 

Web Title: Black Australorp' chicken is increasing farmer's income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.