बालाजी देवर्जनकर
जेव्हा आईच्या कष्टायला मुलांच्या तांत्रिक कौशल्याची जोड मिळते, तेव्हा एका नव्या 'बिझनेस क्रांती'चा जन्म होतो.(Umed Scheme)
'चूल आणि मूल' ही जुनी ओळख पुसून, 'उमेद'च्या बळावर आज गावखेड्यातील महिला कोट्यवधींच्या साम्राज्यावर आपली नाममुद्रा उमटवत आहेत.(Umed Scheme)
शहरातील नोकरीमागे धावण्यापेक्षा आपल्याच मातीतील व्यवसायाला 'ग्लोबल ब्रँड' बनवण्याची जिद्द तरुण पिढीने दाखवली आहे.(Umed Scheme)
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महिला आता केवळ गृहिणी उरल्या नसून, खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या 'बिझनेस लीडर्स' बनल्या आहेत.
नागपुरात आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनात 'उमेद' जागविलेल्या काही महिलांच्या यशोगाथा समोर आल्या. या परिवर्तनाचे सर्वात सुंदर पैलू म्हणजे पिढीतील बदल ठरले आहेत.
प्रेरणादायी गोष्ट ही की, गडचिरोलीच्या दुर्गम एटापल्ली तालुक्यातील एका बचत गटाची वार्षिक उलाढाल ८० लाखांच्या घरात आहे. येथील कष्टकरी माऊलीची मुलगी प्रणाली गावडे ही एम.एस्सी हॉर्टिकल्चर पूर्ण करून पीएच.डी. करतेय.
वंदना गावडे या 'आदिवासी लक्ष्मी' गटाच्या माध्यमातून मोहफूल व अंबाडीचे सरबत विकतात, तर गोंदियाच्या सुनीता गौतम यांनी मशरूम उत्पादनात नाव कमावले असून, त्यांची मुलगी नेहा आता या व्यवसायाचे व्यावसायिक व्यवस्थापन पाहते.
अशा अनेक यशोगाथा 'उमेद'च्या माध्यमातून साकारल्या गेल्या आहेत. या यशाला जोड मिळाली ती 'उमेद अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांच्या कल्पक व व्यापक दूरदृष्टीची.
बँकिंग विश्वातील चंद्रपूरची 'लेडी बॉस'
अर्थकारणाची समज केवळ शहरांपुरती मर्यादित नाही, हे चंद्रपूरच्या प्रगती कोल्हे या 'बँक सखी'ने सिद्ध केले आहे.
ही महिला महिन्याकाठी ४० ते ४५ लाखांचे बँकिंग व्यवहार लीलया हाताळते. बँकिंग सेवा दुर्गम भागातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवून त्यांनी केवळ स्वतः ची प्रगती केली नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ दिले आहे.
काही प्रेरणादायी यशकथा
डाळ प्रक्रिया (अकोला)
मंगलाताई सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या डाळ मिलला सुशिक्षित मुलाने 'सप्लाय चेन मॅनेजमेंट'ची जोड दिली. आज ही डाळ आकर्षक पॅकेजिंगसह मोठ्या बाजारपेठेत झळकत आहे.
सेंद्रिय कापूस (यवतमाळ)
पांढरकवड्याच्या उज्ज्वला जाधव सेंद्रिय कापसातून वार्षिक ७ लाखांचा नफा मिळवत आहेत. त्यांच्या लेकीने डिझायनिंगच्या शिक्षणातून या उत्पादनांना 'मॉडर्न लूक' दिला आहे.
केळी प्रक्रिया (जळगाव)
संगीता पाटील यांनी केळीच्या वाखापासून गृहोपयोगी वस्तू बनवून केळीला नवीन बाजारमूल्य मिळवून दिले. त्यातून त्या खऱ्या 'बिझनेस लीडर' ठरल्या आहेत.
काजू व मसाले (कोकण)
रश्मी देसाईच्या घरगुती मसाल्यांना हॉटेल मॅनेजमेंट शिकलेल्या मुलाने मोठ्या हॉटेल साखळीशी जोडून व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे.
बांबू हस्तकला (मेळघाट)
ललिता कंगाले यांच्या बांबूच्या शोभेच्या वस्तूंना मुलाने सोशल मीडिया मार्केटिंगद्वारे थेट मुंबई-पुण्याच्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत पोहोचवले आहे.
भरड धान्य क्रांती (छत्रपती संभाजीनगर)
एकेकाळी मजूर असलेल्या अनिता चव्हाण आज स्वतः चे प्रोसेसिंग युनिट चालवतात. त्यांच्या ज्वारी-बाजरीच्या बिस्किटांनी नवा ब्रँड निर्माण केला असून, १० महिलांना रोजगार दिला आहे.
पांढरी मुसळी (सातपुडा)
विजयमाला वानखेडे यांनी पिकवलेल्या औषधी पांढऱ्या मुसळीची मुलगा संदेश आता ऑनलाइन विक्री हाताळत आहे.
मिरची प्रक्रिया (भिवापूर)
शून्य भांडवलातून उद्योग सुरू करणाऱ्या छबुताईंच्या जिद्दीला मुलाच्या आधुनिक मार्केटिंगची जोड मिळाली आणि 'भिवापूरची मिरची' ब्रँडने कुटुंबालाच समृद्धीकडे नेले.
मोहफूल उत्पादने (गडचिरोली)
ललिता कंगाले यांनी मोहफुलापासून विविध उत्पादने तयार केली. मुलाने पॅकेजिंग आणि तंत्रज्ञानाची धुरा सांभाळल्याने हे कुटुंब राज्यभरात नावाजले जात आहे.
