Agriculture News : ऊस तोडणीनंतरचे तंत्रज्ञान म्हणजे ऊस कापणीनंतर लगेचच होणारी प्रक्रिया, ज्यामध्ये उसातील साखर कमी होऊ नये म्हणून तत्काळ वाहतूक, योग्य साठवणूक याचबरोबर इतर कुठल्या गोष्टींचे नियोजन करावे लागते, ते थोडक्यात समजून घेऊयात...
ऊस तोडणीनंतरचे तंत्रज्ञान
१. ऊसाचे गाळप
- ऊसाच्या तोडणीनंतर लवकरात लवकर म्हणजे ६ ते १२ तासाच्या आत ऊसाचे गाळप करणे आवश्यक असते.
- कारण उशीर झाला तर चांगला गूळ तयार होत नाही. ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा स्टेनलेस स्टीलचा चरखा वापरावा.
- कारण ऊसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संपर्क आल्यास रासायनिक क्रिया होऊन गर्द निळ्या रंगाची संयुगे तयार होतात व त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परीणाम होतो.
- यानंतर रसातील कचरा काढून तो यांत्रिक पद्धतीने फिरणाऱ्या दोन गाळण्यांच्या यंत्रणेचा वापर करून गाळून मंदनात घ्यावा.
- स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून पुढील प्रक्रियेसाठी काहिलीत घ्यावा.
२. रस उकळणे आणि मळी काढणे
- रस उकळण्यासाठी पत्र्याची काहील आतील बाजूने उडदाच्या पीठाने लेपण करून घ्यावे.
- रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाण पेटवून रस तापत ठेवावा.
- मळी काढण्यासाठी १५० ते २०० ग्रॅम चुना ५ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण रसात टाकावे.
- तप्त रसातील मळी संपूर्णतः निघण्यासाठी प्रति १००० लिटर रसासाठी २ किलो भेंडी अर्क २ ते ३ समान हफ्त्यात विभागून काहिलीत टाकावा.
- चुन्याची निवळी घातल्यामुळे रसातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ काळ्या मळीच्या रूपाने रसावर तरंगू लागतात, त्यालाच ढोरमळी म्हणतात.
- पहिल्या ३० ते ३५ मिनिटात ढोरमळी शिब्याच्या सहाय्याने काळजीपूर्वक काढावी व त्यानंतर स्फुरद आम्ल १५० ते २०० मिली प्रति १००० लिटर रसासाठी वापरावे.
- प्रा. एस. एस. प्रचंड, डॉ. डी. आर. निकम, डॉ. व्ही एन. गमे,
सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी हुलाजी सिताराम पाटील, कृषी महाविद्यालय, नाशिक
