Animal Healthcare : हिंगोली जिल्ह्यात पशुधनाच्या आरोग्य सेवेसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत उभारण्यात आलेल्या ६९ पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या जाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांवर उपचार शक्य झाले आहेत. (Animal Healthcare)
१ एप्रिल ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तब्बल १ लाख ७२ हजार ७९७ जनावरांवर उपचार करण्यात आल्याची अधिकृत नोंद आहे. (Animal Healthcare)
मात्र, प्रत्यक्षात शेतावर किंवा गोठ्यात अचानक जनावर आजारी पडल्यास वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुपालकांना अनेकदा खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.(Animal Healthcare)
जिल्ह्यातील सर्व ६९ पशुवैद्यकीय चिकित्सालयांमध्ये जनावरांसाठी औषधोपचारासह लसीकरण, तपासणी आणि विविध पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.
या कालावधीत केवळ उपचारच नव्हे, तर पशुधनाची पिढी सुधारण्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी २८ हजार ६३६ कृत्रिम रेतन करण्यात आले आहेत. तसेच दुभत्या जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी गर्भतपासणी १ लाख ७२ हजार २८७ जनावरांची करण्यात आली आहे.
लसीकरण व रोगनिदानावर भर
जिल्ह्यात पशुधनातील आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत ७ लाख ४९ हजार ७४३ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच विविध आजारांचे अचूक निदान करण्यासाठी ३ हजार ८१५ रोग नमुने संकलित करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. याशिवाय वंध्यत्वामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ८ हजार ६४३ जनावरांची वंध्यत्व तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
'गोल्डन अवर' आणि खासगी डॉक्टरांचा आधार
जनावरांच्या आजारांमध्ये उपचारासाठीचे पहिले काही तास म्हणजेच 'गोल्डन अवर' अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक वेळा शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालयात तातडीने डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार पशुपालकांकडून केली जात आहे.
काही ठिकाणी एका चिकित्सालयात दोन डॉक्टर असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एकच डॉक्टर किंवा कधी कधी कुणीही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. फोन केल्यास डॉक्टर दुसऱ्या गावात असल्याचे कारण दिले जाते, अशा तक्रारीही पशुपालक करत आहेत.
या परिस्थितीत मरणासन्न जनावराचा जीव वाचवण्यासाठी पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना पदरचे पैसे खर्च करून बोलवावे लागत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी, शासकीय सेवा उपलब्ध असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुपालकांचा कल खासगी डॉक्टरांकडे वाढत असल्याचे चित्र आहे.
पशुपालकांच्या अपेक्षा
पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाकडे डॉक्टरांची नियमित उपस्थिती, वेळेचे योग्य नियोजन आणि आपत्कालीन सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. शासकीय पशुवैद्यकीय सेवांचा लाभ वेळेवर आणि थेट शेतावर मिळाल्यास पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळेल, तसेच पशुधनाचे नुकसानही टाळता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
