नरवाड : रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, शेणखताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
एक ट्रॉली shenkhat शेणखत पाच हजार रुपये झाले आहे. पशुपालन हा शेतीला जोडधंदा असतानाही सध्या शेणखताची टंचाई भासत आहे.
जनावरांच्या मलमूत्रापासून व शेतातील पाचटापासून उत्तम शेणखत तयार होते. शेणखतात शेतीला उपयुक्त असे अनेक घटक असून, यामुळे शेतातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पिकांना वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पांढऱ्या मुळ्यांची निर्मिती होते.
शेणखतात नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, लोह, तांबे, बोरॉन, मॉलिब्लेडनम, कोबाल्ट इत्यादी अन्नद्रव्ये खताच्या गणवत्तेनुसार पिकांना मिळतात. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राहते. याशिवाय शेणखतामुळे शेतातील पिके पोसून उत्पादनात भरीव वाढ होते.
मात्र, हेच शेणखत पूर्ण कुजलेले नसल्यास याचे दुष्परिणामही पिकांवर होतात. एकरी १० ते १५ टन इतके खत शेतीला द्यावे लागते. मात्र, शेणखताच्या टंचाईमुळे किमती भडकल्या आहेत.
शेणखताची एक ट्रॉली डबा पाच हजार रुपयांना मिळतो, तर हाच लेंडी खताचा डबा सात हजार रुपयांना मिळत आहे. याशिवाय एक ट्रक शेणखत ९,५०० रुपयांना मिळत आहे तर लेंडी खताचा एक टक १८ हजार रुपयांना मिळत आहे.
अधिक वाचा: जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर