Fish Farming : आजच्या काळात मत्स्यसंवर्धन हा एक प्रगत आणि हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. मत्स्यपालनासाठी अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत, मत्स्यसंवर्धनासाठी माशांच्या कुठल्या जाती बेस्ट आहेत, हे पाहुयात....
संवर्धनासाठी प्रमुख मासे
मोठा आकार, सोपी प्रजनन पध्दती, वनस्पतीजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी व सुदृढ मत्स्यबीजाची निवड करणे गरजेचे असते. नैसर्गिक तलावामध्ये स्थानिक मासे, खेकडे, झिंगे, पान वनस्पती इत्यादी नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. म्हणून नैसर्गिक तलावामध्ये मत्स्य संवर्धनासाठी स्थानिक माशांची निवड करावी. उदा. कटला, रोहू, मृगल, देशी मागूर, कोळंबी इत्यादीची निवड करावी.
कृत्रिम तलावामध्ये स्थानिक मासे, खेकडे, झिंगे, पान वनस्पती इत्यादी नैसर्गिकरित्या उपलब्ध नसतात. म्हणून कृत्रिम तलावामध्ये भारतीय प्रमुख कार्प प्रजाती, देशीमागूर, कोळंबी, पंगस, कॉमन कार्प, तिलापीया इत्यादी कोणत्याही प्रजातींची निवड करु शकतो. माशांची निवड करताना त्यांचा बाजारभाव, मत्स्यबीजाची सहज उपलब्धता, सुसंगतता इत्यादी बाबी लक्षात घेऊन संवर्धनास सुरवात करावी.
संवर्धनासाठी पर्यायी मासे
काही जलाशयात जलचर वनस्पती त्याचप्रमाणे छोटी झुडपे आढळतात, अशा जलाशयात ग्रास कार्प या माशाचे बीज सोडता येऊ शकते. या माशांचे प्रमुख खाद्य जलीय वनस्पती असल्यामुळे त्याची वाढ चांगली होते व पाण्यातील वनस्पतीवरही नियंत्रण राहते. लहान जलाशयातील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी सवंर्धनावर आधारित मासेमारीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
याकरीता नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पिंजरा संवर्धन पध्दत व कुंपण संवर्धन पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. लहान जलशयातील मत्स्यसाठे वाढविण्यासाठी मत्स्यबीज व कोळंबीची पिल्ले पिंजरा किंवा कुंपणामध्ये सोडून ती बोटुकली आकारापर्यंत वाढवली जातात व त्यानंतर जलाशयाच्या मोकळ्या पाण्यात सोडली जातात.
तलावातील मत्स्यसंवर्धनाचे दोन प्रकार
एक प्रजाती संवर्धन - ज्यामध्ये एकाच प्रजातीच्या माशांचे संवर्धन केले जाते. उदा. तिलापिया, पेंगॅसिस, देशी मागूर, मरळ, इत्यादी.
मिश्र प्रजाती संवर्धन - ज्यामध्ये आपण तलावातील मिळणारे नैसर्गिक अन्न, जागा, पूर्णपणे वापरली जाण्यासाठी सर्वसाधारणपणे तीन प्रजातीच संवर्धन करतो. उदा. कटला, रोहू व मृगल किंवा कटला, रोहु व कोळंबी.
- महेश शेटकार, पदव्युत्तर विद्यार्थी, मत्स्यजीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी स्वप्नील घाटगे, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर
