Fishermen Damage : सप्टेंबर महिन्यात सलग १८ दिवस पडलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीत तब्बल २२ कोटी रुपयांचे मत्स्यबीज वाहून गेले. (Fishermen Damage)
याशिवाय बोटी, होड्या, जाळी, मत्स्यपालन केंद्रे तसेच उपकरणांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली. (Fishermen Damage)
जिल्हानिहाय आढावा
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी विभागाचे आयुक्त किशोर तावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त सुरेश भारती, सहा. आयुक्त मधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.
मराठवाड्यातील एकूण ३८५ तलावांपैकी तब्बल ३३० तलाव अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत.
जलाशय पाण्याखाली गेल्यामुळे मत्स्यसाठा, बीज, बोटी, होड्या, जाळी यांचे नुकसान झाले आहे.
पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पाचेही नुकसान झाल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शिरीष गाथाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,लातूर जिल्ह्यात १५८ तलाव, धाराशिव २३६, नांदेड ९३ व हिंगोली ३० तलाव अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून, एकूण ५१६ तलावांना फटका बसला आहे.
मच्छीमारांची मागणी
या बैठकीत मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक तुकाराम वानखेडे यांनी नुकसानभरपाई व मच्छीमारांना घरे देण्याची मागणी केली. तसेच, परप्रांतातून मत्स्यबीज ५० पैशांत मिळते, मात्र शासकीय यंत्रणेचे बीज दीड रुपयांना विकले जाते, असे सांगत त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
मंत्री राणे यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबतचा कार्यक्रम तयार करावा. राज्यस्तरीय कार्यक्रमाची आखणी मंत्रालयातून केली जाईल.जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या तलावांच्या पंचनाम्याबाबत लवकरच ग्रामविकासमंत्र्यांशी चर्चा होईल.
याशिवाय, चिलापी माशामुळे स्थानिक माशांना धोका निर्माण होत असल्याची शंका व्यक्त झाली असता, राणे यांनी सांगितले की, या प्रश्नावर केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला असून लवकरच योग्य उपाययोजना केली जाईल.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसायाला मोठा फटका बसला आहे. २२ कोटींचे मत्स्यबीज वाहून गेल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले असून, सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.