अलिबाग : मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी पावसामुळे अजूनही मासेमारी ठप्पच आहे. हंगाम सुरू होऊनही अजूनही नौका किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमार बांधव धास्तावले आहेत.
पावसाचे प्रमाण कमी होऊन लवकरच मासेमारीला सुरुवात होण्याची प्रार्थना मच्छीमार करत आहेत. वातावरणातील सततचे बदल यामुळे मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
१ जून ते ३१ जुलै हा कालावधी मासेमारी बंदीसाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली आहे.
यामध्ये ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट आणि इतर लहान नौकांद्वारे मासेमारी करण्यास शासनाची परवानगी आहे. पर्ससिननेटने मासेमारी करण्यास १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हे तीन महिने देण्यात आले आहेत.
व्यवसाय धोक्यात येणार का?मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच श्रावण महिना सुरू असल्याने मासे खवय्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यातच मासे मिळण्याचे प्रमाण कमी असले तरी त्याला दर मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मासेमारीच्या सुरुवातीलाच मासेमारीला सूर मिळत नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात आले आहेत. यापुढेही वातावरण असेच राहिले तर मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोल मासेमारी ठरू शकते धोकादायकवातावरणामध्ये स्थिरता अजूनही आलेली नाही. समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने खोल समुद्रात नौका नेणे धोकादायक ठरू शकते. पावसाचे प्रमाण वाढल्याने समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नौका अजूनही किनाऱ्यावर असल्याने खलाशांसह डिझेलचाही खर्च भागत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. गुरुवारी पाऊस थांबला असला तरी मच्छीमारांच्या मनातील भीती कायम आहे.
येथील किनारपट्टीवर वावळ (हुक फिशिंग), ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. या पद्धतीच्या मासेमारीतून सुरमई, पापलेट, बांगडे, कोकरी, बोईट, सावंदाळा, टोकी, पेडवे, तारली, कोलंबी, कुर्ले, म्हाकुल, मोडुसा, काडय, आदी मासे बाराजातून दुर्मीळ झाले आहेत. जाळीत मासेच मिळत नसल्याने बोटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. - सतीश नाखवा, मच्छीमार
अधिक वाचा: रब्बी ज्वारीचे बियाणे अनुदानावर मिळणार; प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य