रत्नागिरी: जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीचे आज गुरुवार, दि. ९ जानेवारी सकाळी १० वाजता मुंबईत मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
तर, रत्नागिरीतील भाट्ये येथे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्यातील ७ सागरी जिल्ह्यांकरिता एकूण ९ ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ७ सागरी जिल्ह्यात आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाकडे गस्तीनौका आहेत. त्यासोबतच जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांचे मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकेल.
ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असून, हे ड्रोन सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरून सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे.
सागरी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवत मासेमारीचे नियमन करण्याकरिता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली ८ वर्ष व २ वर्ष मुदतवाढ या कालावधीकरिता भाडेपट्टीने घेण्यात आलेले आहेत.
याठिकाणी ड्रोनसेवाशिरगाव-पालघर, उत्तन-ठाणे, गोराई-मुंबई उपनगर, ससुनडॉक-मुंबई शहर, रेवदांड व श्रीवर्धन रायगड, मिरकरवाडा-रत्नागिरी व साखरीनाटे-रत्नागिरी आणि देवगड-सिंधुदुर्ग याठिकाणांचा समावेश आहे.
७ नियंत्रण कक्षशिरगाव-पालघर, वेलनकनी उत्तन-ठाणे, गोराई-मुंबई उपनगर, ससूनडॉक-मुंबई शहर, वसौली- रायगड (१ नग), भाट्ये-रत्नागिरी आणि देवगड-सिंधुदुर्ग.