Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो कशामुळे? कसे कराल व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 10:20 IST

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण कमी होते.

याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईंप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात, त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे.

उन्हाळा आणि म्हशींची काळजी:

  • कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्यतो सकाळ अथवा संध्याकाळी करावे.
  • म्हशींना डुंबण्यास सोडावे. ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते.
  • म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे.
  • दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे.
  • गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्यक आहे.
  • उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे.
  • जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे, शक्य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.
  • पंख्याचा वापर करून उष्णता कमी करता येते. उन्हाच्या वेळी असे पंखे थंड वातावरण निर्मितीसाठी उपयोगी ठरतात.
  • मोठ्या आकाराचे छतास बसविलेले पंखे गोठ्यांत वापरता येतात. उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्याचा शिडकारा याचा उपयोग करु शकतो.
  • थंड पाणी शिंपडल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तेव्हा दर तासाला थंड पाण्याचे फवारल्यास गोठ्यातील उष्णतामान तर कमी होतेच, पण जनावराच्या शरीरावरचा उष्णतेचा ताण एकदम कमी होतो.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक म्हशी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी तलाव, पाणथळे यात बसविल्या जातात. यातून म्हशींचे शरीर तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी अस्वच्छ पाणी, वर चमकणारे ऊन, रोगप्रसार यांच्यादृष्टीने चुकीचा मार्ग अवलंब होतो.
  • त्यापेक्षा गोठ्यातच जनावरांच्या अंगावर ओला कपडा टाकणे आणि तो कपडा दर तासाला थंड पाण्याने ओला करणे अधिक चांगले.
  • जनावरे गोठ्यात मोकळी असल्यास थोडीफार हालचाल करून उष्णतेचा ताण कमी करतात, पण बांधलेली जनावरे मात्र अधिक अस्वस्थ होऊन त्यांचा श्वास वाढतो.
  • उन्हाळ्यात जनावरांच्या गोठ्यात थंडावा वरील प्रमाणे कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यामुळे तापमान वाढल्याची नोंद झाल्याबरोबर उष्णतेचा ताण कमी करता येतो.

पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधपाणीगाय