Join us

सुदृढ पशुधनाची शाश्वत पायाभरणी करतांना 'हे' मात्र विसरू नका; फायद्याचे वासरांचे योग्य संगोपन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:18 IST

वासरांचे संगोपन हे पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील टप्पे आहे. जर वासराचे संगोपन सुयोग्य पद्धतीने आणि वेळेवर झाले तर त्यातून भविष्यात उत्कृष्ट दूध देणारी गाय तयार होते. 

वासरांचे संगोपन हे पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील टप्पे आहे. जर वासराचे संगोपन सुयोग्य पद्धतीने आणि वेळेवर झाले तर त्यातून भविष्यात उत्कृष्ट दूध देणारी गाय तयार होते. 

लहानपणी घेतलेली काळजी, योग्य आहार, लसीकरण आणि आरोग्याची निगा हे सर्व घटक वासराच्या एकूणच विकासावर थेट परिणाम करतात.

म्हणूनच वासरांच्या संगोपनाकडे केवळ एक दैनंदिन जबाबदारी म्हणून न पाहता, ती एक दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक समजूनच पाहणी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. खाली वासरांच्या संगोपनाची टप्प्याटप्प्याने माहिती दिली आहे. 

१. जन्मानंतरची काळजी (पहिले १५ दिवस)

• श्वास मार्ग स्वच्छ करणे : वासराचा जन्म झाल्यानंतर लगेच नाक व तोंडातील चिकट पदार्थ काढून टाकावेत जेणेकरून वासराला श्वास घेण्यास अडथळा येणार नाही.

• आईचे कोलस्ट्रम (पहिले दूध) : जन्मानंतर ३० मिनिटांच्या आत कोलस्ट्रम पाजावे. हे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि वासराला सुरुवातीच्या काळात संरक्षण देते.

• नाळेची काळजी : नाळ स्वच्छ कापून टिंचर आयोडीन लावावे त्यामुळे संसर्ग टाळता येतो.

• उबदार जागा : वासराला थंडीपासून संरक्षण असलेली, कोरडी, स्वच्छ आणि आरामदायक जागा ठेवावी.

२. दूध

• दूध किंवा मिल्क रिप्लेसर : पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आईचे दूध किंवा दूधाच्या जागी पूरक दूध (मिल्क रिप्लेसर) द्यावे.

• प्रमाण : पहिल्या आठवड्यात वासराच्या शरीराच्या वजनाच्या अंदाजे १०% दूध दररोज द्यावे. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवावे, वासराच्या वाढीप्रमाणे.

३. कोरडे खाद्य (Dry Feed)

• चव लावण्यासाठी : वासराला १५ दिवसांपासून थोड्या प्रमाणात कोरडे खाद्य जसे हरभऱ्याच्या डाळीचा चुडा, हरभरा चुर्ण किंवा जनावरांचे 'स्टार्टेड फीड' द्यावे.

• तीन महिन्यांपासून पुढे : हळूहळू गवत व हिरवा चारा द्यायला सुरुवात करावी.

४. लसीकरण व जंतनाशक (Deworming)

• जंतनाशक : पहिल्यांदा १५ दिवसांचे झाल्यावर. नंतर दर दोन ते तीन महिन्यांनी पुन्हा द्यावे.

• लसीकरण : FMD (घोटसर्प), HS (फऱ्या), BQ इत्यादी लसी पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार वेळेवर द्याव्यात. यामुळे गंभीर रोगांपासून वासराचे संरक्षण होते.

५. निवारा व स्वच्छता

• शेडची रचना : वासरासाठी उबदार, कोरडी, वाऱ्यापासून सुरक्षित व पुरेशा प्रकाशाची जागा असावी.

• स्वच्छता : शेड नेहमी स्वच्छ ठेवावी, चिखल किंवा ओलसरपणा टाळावा ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

६. वाढ व वजन नियंत्रण

• वजन टिपणे : मासिक वजनाची नोंद ठेवा, त्यामुळे वाढीवर नियंत्रण ठेवता येते.

• संतुलित आहार : योग्य प्रमाणात प्रथिने, खनिजे व ऊर्जा देणारा संतुलित आहार द्यावा, त्यामुळे शरीराची वाढ योग्य रीतीने होते.

डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहाय्यक प्राध्यापकएमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर.

प्रा. एस. एस. जंजाळसहाय्यक प्राध्यापकएमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर.

हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेतकरीशेती क्षेत्रगायदूध