Join us

गाई म्हशींमध्ये वार किंवा जार कशामुळे अडकते काय करावे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 18:39 IST

गर्भाशयात असताना वासराच्या भोवती जे आवरण असते त्यालाच वार असे म्हणतात. नैसर्गिकरित्या वासराचा जन्म झाल्यावर गर्भाशयाचे आकुंचन प्रसरण होते.

गर्भाशयात असताना वासराच्या भोवती जे आवरण असते त्यालाच वार असे म्हणतात. नैसर्गिकरित्या वासराचा जन्म झाल्यावर गर्भाशयाचे आकुंचन प्रसरण होते.

त्यामुळे गर्भाशयाची व वारेची फुले सुटतात आणि वार बाहेर टाकायला मदत होते. गाई-म्हशीची प्रकृति निकोप असली, तिच्या विण्यापूर्वी आहार समतोल असेल तर वार व्याल्यानंतर २ ते ८ तासात बाहेर टाकली जाते. 

वार न पडण्याची कारणे- विण्याच्या वेळी गर्भाशयाच्या व पोटाच्या स्नायुंचे आकुंचन प्रसरण होते. त्यामुळे गाई/म्हशीची खूप ताकद खर्च होते.या नंतर वार पडण्यासाठी सुध्दा गर्भाशयचे आकुंचन प्रसरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शरीरात जादा ताकद असणे जरूरीचे आहे. अशी ताकद नसली तर वार बाहेर टाकली जाणार नाही.वार पडण्यासाठी जशी ताकद (ऊर्जा) जरूरी आहे त्याच प्रमाणे योग्य प्रमाणात कॅल्शियम व स्फुरद यांची जरूरी आहे तर अत्यल्प प्रमाणात सेलेनियम-तांबे व आयोडिन या खनिजांची आवश्यकता आहे.यासाठी रोजच्या पशु आहारात खनिज मिश्रण (मिनरल मिक्स्चर) देणे आवश्यक आहे. जिवाणू विषाणुजन्य आजार अथवा इतर कारणांमुळे गर्भाशयाचा दाह (उदा. 'सांसर्गिक गर्भपात' इ.) असेल तर वार लवकर सुटत नाही, अटकून रहाते.व्याल्यानंतर गर्भाशयाच्या आकुंचन प्रसरणाची क्रिया लगेच सुरू झाली तर वारेचा न सुटलेला भाग तसाच गर्भाशयात अटकून राहतो.अपुऱ्या दिवसात व्यालेल्या/गाभडलेल्या गुरात वार अटकते. विताना गाईला त्रास झाला (वासरू आडवे येणे) त्यामुळे गाय दमली तर वार पडत नाही.ज्या जनावरात जुळी वासरे जन्माला येतात त्या जनावरांमध्ये वार अटकण्याचे प्रमाण जास्त असते.ज्या जनावरांमध्ये गामण काळ जास्त असतो त्या जनावरांमध्ये वार अटकण्याचे प्रमाण जास्त असते.- वार जर अटकली तर 'गर्भाशयाचा दाह होतो. त्यामुळे गाय/म्हैस लवकर माजावर येत नाही, गाभण रहात नाही, त्यामुळे दोन वेतातील अंतर वाढते.

वार अटकल्यावर करावयाचे उपाय१) वार कधीही हाताने काढू नये. लगेच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.२) गाभण काळात गाई-म्हशीला योग्य आहार द्यावा.३) व्याल्याबरोबर गाई-म्हशीला लगेच गुळाचे द्रावण द्यावे (कोमट पाणी १० लिटर, त्यात अर्धा किलो गुळ)४) गाई-म्हशींची विण्याच्या वेळी प्रकृति चांगली हवी, अशक्त नको.५) गाई-म्हशींची रोज न चुकता पशुवैद्यकाच्या शिफारशीनुसार खनिज मिश्रण द्यावे.६) गाई-म्हशीला 'सांसर्गिक गर्भपाता'चा आजार नाही याची तपासणी करून घ्यावी.७) विण्यापूर्वी गोठा स्वच्छ ठेवा. विण्यापूर्वी शेवटचा आठवडा रोज निरण-शेपटी कासेचा मागचा भाग कोमट पाण्याने धुवावा. व्याल्यानंतर अशीच स्वच्छता ठेवावी.८) व्याल्यानंतर लगेच कास धुवून कोरडी करून चीक पिळावा व वासरास द्यावा त्याने वार सुटावयास मदत होते.९) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरीत उपचार करावे.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीडॉक्टर