Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारणेने म्हैस दूध दरात केली प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 13:58 IST

म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल

वारणा दूध संघाने १३८९ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली असून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल देण्याची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.

वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाच्या कार्यस्थळावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडुरकर यांनी स्वागत करून दुग्ध व्यवसायासमोर अनेक आव्हाने असताना या परिस्थितीला सामोरे जाऊन संघाने यशस्वी वाटचाल केल्याचे सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

डॉ. कोरे म्हणाले, कोरोना महामारीचे संकट आणि जनावरांमध्ये शिरलेल्या लम्पीसारख्या आजारामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. अशा काळात वारणेने दूध उत्पादकांना दूध दर, विविध सवलती, फरक बिलासारखे लाभ दिलेत, जादा दराचे आमिष दाखवून बाहेरील कंपन्या सहकारी तत्वावरील संस्था मोडीत काढण्याचा कुटील डाव करीत आहेत. यावर पर्याय म्हणून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याचा निर्णय वारणेने घेतला आहे. वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दुधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल, त्यामुळे संस्थांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येणार आहे.यावेळी नॅशनल को. ऑप. डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक संचालक श्रीनिवास सज्जा, व्यवस्थापक अविनाश घुले, संजीव आग्रवाल, भारतीय रेल्वेचे वारणाचे राष्ट्रीय वितरक अमित कामत, आंध्रप्रदेशातील दुग्ध व्यवसायातील उद्योजक हर्षा गांधी यांच्यासह दूध संघातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था, दूध उत्पादक व गोठेधारकांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार आला.

कार्यकारी संचालक मोहन येडुरकरयांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेस संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, लेखापरीक्षक रणजीत शिंदे, संघाचे सर्व संचालक मंडळ, वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायकोल्हापूरविनय कोरेशेतकरी