दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र हे वर्षाला एक वेत घेण्यावर अवलंबून असते. त्यासाठी आपण आपल्या गाईचे वर्षाला एक वेत व म्हशीचे सव्वा वर्षात एक वेत कसे घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यासाठी आपण आपल्या व्यवस्थापनाचा दर्जा जर चांगला ठेवला तर निश्चितपणे आपण असे वेत घेऊ शकतो. यातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक पशुपालकांनी आपल्या गाई म्हशीची गर्भधारणा तपासणी वेळेवर करून घेणे.
जनावर गाभण आहे कसे ओळखावे?◼️ कृत्रिम रेतनानंतर जनावर जर २१ दिवसानंतर माजावर आले नाही तर ते गाभण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.◼️ तथापि पुढील ४२ व ६३ दिवसांनी येणारा दुसर्या व तिसऱ्या माजावर लक्ष ठेवून जर जनावर माजाला आले नाही तर मात्र आपण आपले जनावर गाभण असणार ही खात्री बाळगायला हरकत नाही.◼️ पण ही खात्री नेहमी नजीकच्या तज्ञ पशुवैद्यकाकडून करून घेतली की पुढील नियोजन करणे सहज शक्य होते.
गर्भधारणा तपासणी का महत्वाची?◼️ अनेक वेळा जनावरे अनियमित माज दाखवत असतात. वाढत्या हवामान बदलामुळे जनावरे नियमित माजावर येत नाहीत.◼️ काही वेळा गर्भधारणा झाल्यानंतर तो लहान गर्भ रोगजंतूंना बळी पडू शकतो. काही अनुवंशिक दोष असतील तर गर्भाची वाढ होत नाही. तो गर्भ मृत होतो.◼️ नंतर जनावर काही कारणामुळे तात्पुरते वांझ देखील राहू शकते. पण आपण जर गर्भधारणा तपासणी करून घेऊन खात्री केली नाही तर मात्र आपले खूप दिवस वाया जाऊन आपल्या संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र बिघडू शकते.
गर्भधारणा तपासणीबद्दल महत्वाचे मुद्दे◼️ कृत्रिम वेतनानंतर साधारण साधारण गाईमध्ये दोन महिने व म्हशीमध्ये अडीच महिन्यानंतर गर्भधारणा तपासणी करून घ्यावी.◼️ अनेक पशुवैद्यक खात्रीने ही बाब तपासून सांगू शकतात. पण जर का त्यांनी एक महिन्यांनी पुन्हा तपासणी करून घेण्यास सांगितले तर मात्र निश्चितपणे पुन्हा तपासून खात्री करावी.◼️ तशी नोंद आपल्या नोंदवहीत करून ठेवावी. त्यासमोर विण्याची संभाव्य तारीख देखील नोंदवून ठेवावी. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे शक्य होते व होणारे नुकसान टाळता येते.◼️ अनेक वेळा पशुपालक गर्भधारणा तपासणीनंतर गर्भपात होईल, दूध उत्पादनावर परिणाम होईल म्हणून गर्भधारणा तपासणी करून घेणे टाळतात व आपले नुकसान करून घेतात.◼️ काही वेळा डोक्यावरचे केस गेलेत, अंगावर साबणाचा फेस होतोय अशा काही गैरसमजुती अंधश्रद्धा डोक्यात ठेवून जनावर आपले गाभण आहे असे समजतात. ते देखील खूप धोक्याचे आणि नुकसान पोहोचवणारे आहे.◼️ पशुवैद्यकाकडून होणारी ही गर्भधारणा तपासणी अत्यंत सुरक्षित व कमी वेळेत होणारी तपासणी आहे. त्यामुळे प्रत्येक पशुपालकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी व आपले योग्य नियोजन करावे.◼️ अनेक वेळा जनावर गाभण नसेल तर आपल्याला योग्य ते उपचार, व्यवस्थापनातील बदल करून सदर जनावर वेळेवर गाभण कसे राहील यासाठी प्रयत्न करता येतात. होणारे नुकसान देखील आपल्याला टाळता येते.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर