सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे.
दुग्ध व्यवसायात मुरघासामुळे दुधाचे उत्पादन वाढते आणि जनावरांचे आरोग्य टिकून राहते हे लक्षात घेत अलीकडच्या काळात मुरघासाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.
मात्र मुरघास करताना अनेक शेतकरी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून येते. चाऱ्याच्या योग्य अवस्थेतील कापणीपासून ते कुट्टीची लांबी, पोषणमूल्ये टिकवण्यासाठी वापरली जाणारी पूरक घटकद्रव्ये, कल्चरचा वापर, साठवणुकीची पद्धत अशा अनेक मुद्द्यांकडे योग्य लक्ष दिले जात नाही.
परिणामी तयार होणाऱ्या मुरघासात आवश्यक ती पोषणमूल्ये राहत नाहीत. त्याचा थेट परिणाम जनावरांच्या पचनशक्तीवर, दुधाच्या उत्पादनावर आणि एकूणच आरोग्यावर होतो. काही वेळा तर अशा चुकीच्या मुरघासामुळे जनावरांचे आरोग्य ढासळू शकते आणि शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. तेव्हा योग्य पद्धत कोणती? आपण कुठे चुकतो? जाणून घेऊया.
अर्धवट मकाचा मुरघास करणे
काही शेतकरी मका पिकाचे कणीस पूर्ण भरून न येताच म्हणजेच मका अगदीच हिरव्या अवस्थेत असतानाच ते चारा म्हणून कापतात. तर अनेकजण मकाचे कणीस वेगळे करून फक्त दांडे आणि पाने चाऱ्यासाठी वापरतात. त्यामुळे तयार होणाऱ्या मुरघासात ऊर्जा (कार्बोहायड्रेट) आणि प्रथिने यांचे प्रमाण कमी राहते. मुळात मुरघासात सर्वात जास्त पोषणमूल्य हे मका कणसातच असते. त्यामुळे कणीस न काढताता संपूर्ण मकाच मुरघासासाठी वापरणे हे अधिक फायदेशीर ठरते.
गूळ-मीठ टाकतात पण ‘कल्चर’ वापरत नाहीत!
काही शेतकरी मुरघास करताना चाऱ्यात गूळ, मीठ, कधी कधी कडधान्य पीठ टाकतात जे एकप्रकारे चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी उपयुक्त असते. मात्र, अनेकजण कल्चर (सिलेज इनॉक्युलंट) वापरत नाहीत. कल्चरमुळे चाऱ्यात लॅक्टिक अॅसिड तयार होऊन मुरघास अधिक काळ टिकतो आणि खराब होण्याची शक्यता कमी होते. त्याशिवाय चाऱ्याची पचनशक्ती वाढते आणि जनावरांना चारा उपयुक्त ठरतो. त्यामुळे केवळ गूळ व मीठ न टाकता, शास्त्रशुद्ध कल्चर वापरणे आवश्यक आहे.
चुकीच्या पद्धतींमुळे तयार होणाऱ्या मुरघासाचे परिणाम
• प्रथिने, कार्बोहायड्रेट यांचे प्रमाण कमी राहते.
• मुरघास लवकर खराब होतो, वास येतो.
• जनावरे आवडीने खात नाही.
• दुधाचे उत्पादन कमी होते.
• चाऱ्याची नासाडी होते, खर्च वाढतो.
यावर उपाय काय?
• मुरघासासाठी मका पिकाचे पूर्ण वाढलेले पीक (कणीसासकट) वापरणे.
• मुरघास करताना कल्चरचा वापर आवर्जून करणे.
• योग्य लांबीने सर्व भागांची समतोल कुट्टी करणे.
• मुरघास साठवितांना प्लास्टिकमध्ये हवेचा संपर्क येणार नाही याची काळजी घेणे.
• योग्य प्रमाणात गूळ, मीठ टाकणे याचा फारसा अतिरेक नको.