Join us

मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:42 IST

kadba bajar bhav शेतकरी पावसाळ्यात जनावरांना वाळकी वैरण म्हणून ज्वारीच्या कडब्याचा वापर करतात. यंदा ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात जनावरांना वाळकी वैरण म्हणून ज्वारीच्या कडब्याचा वापर करतात. यंदा ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी आहे.

जिरायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात ज्वारीच्या कडब्याची टंचाई जाणवू लागल्याने कडब्याला चांगली मागणी आहे. त्याचा दर कडाडला आहे.

बागायती क्षेत्रातील शेतकरी जिरायती शिवारात जाऊन कडब्याची खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षीच्या रब्बीतील ज्वारीच्या कडब्याला मागणी कमी असल्याने दर कमी होता, त्याला कारणेही तशीच होती.

बागायती क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस लवकर गेल्याने तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई असल्याने ज्वारीचे पीक घेतले होते. त्यामुळे कडबा खरेदी करण्याची गरजच भासली नव्हती.

यंदाची परिस्थिती वेगळी आहे. बागायती क्षेत्रात मुबलक पाणी असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. पावसाळ्यात सुका चारा असावा म्हणून ज्वारीच्या कडब्याची खरेदी केली जात आहे.

गतवर्षाच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्याने तालुक्यातील जिरायती क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 

कसा मिळतोय कडब्याला दर?कडब्याचा दर एक कट्टी शेकडा एक हजार ते एक हजार दोनशे होता. तर दोन कट्टी कडब्याचा शेकडा एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये होता. तर सध्या एक कट्टी कडबा शेकडा दोन हजार ते दोन हजार दोनशे आहे.

गत वर्षाच्या तुलनेत यंदा ज्वारीच्या कडब्याला चांगली मागणी असल्याने दर समाधानकारक आहे. यामुळे आम्हाला चार पैसे मिळतील. - सुनील पोळ, शेतकरी शामगाव

अधिक वाचा: जनावरांत कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीज्वारीदुग्धव्यवसायगायदूधकराड