Join us

पशुपालकांचे अर्थकारण बिघडले! दुधाचे भाव कमी अन् पशुखाद्याचे मात्र वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 15:00 IST

समाधानकारक पाऊस नसल्याने चारा अपूरा..

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे भाव कमी झाले असताना पशुखाद्याचे भाव मात्र वाढल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. काही जण स्वतंत्र दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लागत होता; मात्र या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने नदी, नाले कोरडे आहेत. शेत शिवारात पाऊस नसल्याने जनावरांचा चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पशुपालक हैराण झाले आहेत.

अशात सतत वाढत्या महागाईमुळे दुभत्या जनावरांचा पूरक आहारही कमी होत आहे. घरी एक-दोन जरी दुभती जनावरे असली तरी सगळ्या कुटुंबालाच त्यासाठी राबावे लागत आहे. रामनगर  येथील छत्रपती दूध संकलन केंद्राचे रुपये प्रति लिटरचा भाव मिळत आहे. चालक काकासाहेब गव्हांडे म्हणाले, मागील तीन महिन्यांपूर्वी हाच भाव गायीच्या दुधाला २८ रुपये प्रति लिटर होता.

अर्थकारण बिघडले

■ सध्या जनावरांच्या पेंडेचा ५० किलोचा दर १ हजार ७०० रुपये आहे. तीन महिन्यांपूर्वी हाच दर १ हजार ५०० रुपये होता. सुग्रास कांडी १ हजार ६०० रुपये होती, ती आता १ हजार ७५० झाली आहे. ऊस आणि चारा कुट्टीचे भावदेखील वाढले आहेत.

■ यापूर्वी दुधाला चांगला भाव मिळू लागल्यामुळे पशुपालकांनी दुभत्या गायीची संख्या वाढवली. त्यामुळे दूध संकलनही वाढले; पण आता दुधाचे भाव कमी झाले आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे, अशी खंत येथील शेतकरी काकासाहेब गव्हांडे, दीपक खुर्दे, अमोल भुसारे, रघुनाथ गव्हांडे, जनार्दन खुर्दे, प्रकाश खुर्दे, भाऊसाहेब नलावडे आदींनी व्यक्त केली.

टॅग्स :दूधशेतकरीदुग्धव्यवसायदुष्काळ