दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील खोर, देऊळगावगाडा आणि पडवी या गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाने (एलएसडी) पुन्हा डोके वर काढले आहे. जनावरांना लसीकरण करूनही हा आजार होत असल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.
भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यातच जर्सी गाईच्या नर वासरांना (अंतुले) सोडून देण्याच्या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून, पशुपालकांचे लाखोंचे नुकसान होत आहे.
शासनाने दोन वर्षांपूर्वी बंद झालेली २५ हजार रुपयांची मदत योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. दौंड तालुक्याच्या दक्षिणेकडील हा भाग प्रामुख्याने शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लम्पी आजाराने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसू लागली आहेत, ज्यात ताप येणे, अंगावर गाठी येणे, दूध उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होणे आणि जनावरांचा अशक्तपणा यांचा समावेश आहे.
'लसीकरण करूनही आजार होत असल्याने आम्ही चिंतेत आहोत. गाई भाकड राहत असल्याने दुधाचा व्यवसाय ठप्प होत आहे, असे स्थानिक पशुपालक सांगतात. या आजारामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे.
सध्या जर्सी गाईच्या नर वासरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद आहे. परिणामी, अनेक शेतकरी ही वासरे मोकळ्या रानात, ओढ्याकाठी, कॅनॉलच्या कडेला किंवा डोंगरात सोडून देत आहेत.
गोठ्यातील पाळीव जनावरांवर होताहेत हल्लेकुत्र्यांना मांसाची सवय लागल्याने ते गोठ्यातील इतर पाळीव जनावरांवर हल्ले करत आहेत. "गेल्या महिन्यात माझ्या गोठ्यातील तीन मोठे बकरे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. यामुळे मला ५० हजार रुपयांचे नुकसान झाले," अशी व्यथा देऊळगावगाडा येथील शेतकरी रमेश जाचक यांनी व्यक्त केली. त्यांच्या गाईलाही लम्पी झाला असून, पूर्वी १० लिटर दूध देणारी गाय आता पूर्णपणे भाकड झाली आहे
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव : एक नवीन धोकाभटक्या कुत्र्यांचे हल्ले ही या भागातील नवी समस्या बनली आहे. सोडलेल्या नर वासरांना खाण्याची सवय लागल्याने कुत्रे आता गोठ्यात घुसून गाई, बकरे आणि इतर जनावरांवर हल्ले करत आहेत. यामुळे अनेक पशुपालक रात्रभर जागरण करत आहेत. "प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील बंदी शिथिल करावी," अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या समस्येमुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे.
आर्थिक आधार द्यावालम्पीमुळे जनावरे दगावल्यास पूर्वी शासनाकडून २५ हजार रुपयांची मदन मिळत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही योजना ठप्प झाली. शासनाने ही योजना सुरू करावी व पशुपालकांना आर्थिक आधार द्यावा," अशी मागणी रमेश जाचक यांच्यासह शेतकरी करत आहेत.
पशुवैद्यकीय विभागाकडून उपाययोजनादेऊळगावगाडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र बांगर यांनी 'लोकमत'ला सांगितले की, "पशुसंवर्धन विभागाकडून आजारी जनावरांवर उपचार सुरू आहेत. सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायतींना डास आणि चिलटे होऊ नयेत म्हणून फवारणीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, लसीकरणाचा परिणाम २१ दिवसांनंतर दिसतो. शेतकऱ्यांनी जनावरांच्या संपर्कावर नियंत्रण ठेवावे, स्वच्छता राखावी आणि बाहेरील जनावरे आणणे टाळावे." त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी आणि उपचारात विलंब करू नये.
माझ्या गाईला लम्पी झाल्याने दूध बंद झाले. भटक्या कुत्र्यांनी तीन बकरे मारले. प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. - रमेश जाचक, शेतकरी, देऊळगावगाडा
अधिक वाचा: साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई