Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jowar Fodder : ज्वारीच्या वैरणीची पेंडी महागली; वाचा ज्वारीच्या कडब्याला शेकडा काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:42 IST

Jwari Kadaba Market Price: ज्वारी पिकात कमालीची घट झाली. त्यामुळे जनावरांसाठी सुका चारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या वैरणीची टंचाई भासू लागली असल्याचे दिसत आहे.

शरद देवकुळेपळशी : माण तालुक्यातील पळशी मार्डी, मोहीसह परिसरात जनावरांच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे.

यावर्षी ज्वारीच्या कडब्याची वैरण कमी प्रमाणात मिळत असल्याने कडब्याचे दर गगनाला भिडू लागल्याचे चित्र दिसत आहे.

परिसरात जवळपास चार ते साडेचार हजार रुपये प्रति शेकडा दराने कडब्याची विक्री होत असून, ज्वारीच्या एका पेंडीसाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने जनावरे जगवणे पशुपालकांना अवघड झाल्याचे दिसत आहे.

परिसरात ज्वारी पिकाच्या क्षेत्रात घट झाली असून, अनेक शेतकरी फळबाग तसेच कांदा, मका आदी पिकांकडे वळले असून, यावर्षी अनेकांनी कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते.

त्यामुळे ज्वारी पिकात कमालीची घट झाली. त्यामुळे जनावरांसाठी सुका चारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या वैरणीची टंचाई भासू लागली असल्याचे दिसत आहे.

सध्या परिसरात चार ते साडेचार हजार रुपये शेकडा दराने कडब्याची विक्री होत असल्याने पशुपालकांना जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने येणाऱ्या दोन महिन्यांत चाराटंचाई भासू नये, यासाठी अनेक पशुपालक मिळेल त्या दराने वैरण खरेदी करून त्याची कडबा कुट्टी करून साठवून ठेवत आहेत.

मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, विहिरींनी तळ गाठला आहे. सर्वसामान्य पशुपालकांना कडबा विकत घेणे परवडत नसल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परिसरात अनेक शेतकऱ्यांनी शेतीला आधार म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. दूध विक्रीतून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे जात असल्याने अनेकजण दुग्ध व्यवसाय करत आहेत.

ओला चारा मिळणे अवघड... दरही वाढला◼️ परिसरात ओल्या चाऱ्याची भीषण टंचाई भासू लागली असून, ओला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे.◼️ मक्याचा ओला चारा दोन हजार रुपये प्रति गुंठा दराने विकत घ्यावा लागत असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

ज्वारीच्या कडब्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा कमी पडू नये, यासाठी मिळेल त्या दराने कडबा घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले. - आनंदराव कचरे, शेतकरी, पळशी

अधिक वाचा: शेतरस्त्यावर अतिक्रमण किंवा शेतरस्ता आडवणे पडणार महागात; होणार आता 'ही' शिक्षा

English
हिंदी सारांश
Web Title : Sorghum Fodder Prices Soar Amidst Scarcity; Farmers Struggle

Web Summary : Sorghum fodder prices are soaring in the Man region due to scarcity. Prices range from ₹4000-4500 per hundred, making it difficult for livestock owners. Reduced sorghum cultivation and increased water scarcity exacerbate the crisis, forcing farmers to purchase fodder at high rates.
टॅग्स :ज्वारीशेतकरीशेतीदुग्धव्यवसायदूधमकापीकदर वाढ