Join us

Milk Rate : दूध दराची मंदी तर पशुखाद्याची तेजी; शेतकरी चिंतेत गुरे दावणीला ठेवावीत की बाजारात न्यावीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:39 IST

Milk Rate In Maharashtra : प्रपंचातील अर्थकारणाला 'आधार' मिळावा, यासाठी त्यांनी दुधाला ३२ रुपये दर अन् पशुखाद्यांच्या पोत्याला हजाराचा 'भाव' आहे म्हणून लाखभर रुपये किमतीच्या गाई घेतल्या. मोठ्या मनोभावे या दुग्ध व्यवसायात स्वतःला झोकून दिले. झालं मात्र उलटंच! पशुखाद्य पोहोचलं साडेसतराशेवर अन् दूध दर आला २३ रुपयांवर.

बालाजी आडसूळ

प्रपंचातील अर्थकारणाला 'आधार' मिळावा, यासाठी त्यांनी दुधाला ३२ रुपये दर अन् पशुखाद्यांच्या पोत्याला हजाराचा 'भाव' आहे म्हणून लाखभर रुपये किमतीच्या गाई घेतल्या. मोठ्या मनोभावे या दुग्ध व्यवसायात स्वतःला झोकून दिले. झालं मात्र उलटंच!

पशुखाद्य पोहोचलं साडेसतराशेवर अन् दूध दर आला २३ रुपयांवर. यामुळे दुधाच्या धंद्यात शेणसुद्धा मागे राहिना गेलं ! अशीच शोकांतिका राशीला आली आहे. 

धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील रामचंद्र भगवान कोल्हे, सुरज बाळासाहेब गंभिरे अशा काही तरुण शेतकऱ्यांच्या राशीला आलेली ही 'धवलक्रांती'ची शोकांतिका प्रातिनिधिक असली तरी इतर शेतकरी पण 'कोणी जात्यात आहे, तर कोणी सुपात' या संक्रमणावस्थेतूनच जात आहेत. 

मागे शेणही उरत नाही हो ..

• हावरगाव येथील रामचंद्र भगवान कोल्हे यांनी बाजारातून लाखभर किमतीला एक, अशा सहा गायी घेतल्या. त्यावेळी दुधाला ३२ रुपये प्रतिलिटर भाव मिळायचा. पशुखाद्यांचे ५० किलोंचे पोते हजारेक रुपयांना मिळत होते. ओला चारा म्हणून शेतात मका, ज्वारीचा कडबा व उसाचा वापर होत होता.

• आता दुधाचा दर २३ ते २४ रुपयांवर आला आहे. पशुखाद्यांचा दर साडेसातशेच्या आसपास पोहोचला आहे. यात माणसांचा राबता, ओला चारा व पशुखाद्यांच्या दरांचा विचार करता नफा म्हणून पदरी शेणसुद्धा राहत नाही, अशी शोकांतिका रामचंद्र कोल्हे यांनी सांगितली.

भरल्या बाजारीही 'बेभाव'च राशीला?

हावरगाव येथील रामचंद्र कोल्हे यांनी राब-राब राबूनही दुधाच्या धंद्यात नफा म्हणून पदरी काहीच पडत नसल्याने अशातच सहापैकी तीन गायी विकल्या. येथेही त्यांच्या नशिबी 'लाखांचे बारा हजारच!' आलं. बाजार पडलेला. चांगल जनावर; पण तीस ते पन्नास हजार या किरकोळ किमतीला. कोल्हे यांच्या लाखभर रुपयांच्या गाईपण अशाच बेभावात विकल्या गेल्या. गोठ्यात ठेवाव्यात तरी तोटाच अन् तोटा व्हायला म्हणून गायी विकावा तरी तोटाच! असेच दुष्टचक्र. 

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी....

• गंभिरवाडी येथील तरुण शेतकरी सूरज बाळासाहेब गंभिरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यांच्या गोठ्यातल्या दावणीला सहा-सात गायींचा राबता. यातील तीनेक सध्या दुभत्या. या गायींपासून दररोज ३० लिटर याप्रमाणे दुग्धोत्पादन. यासाठी तीन पोती पशुखाद्यांचा खुराक, बाकी शेतातील ऊस व मक्याचा वापर.

• आजच्या घडीला २६ ते २७ रुपयांचा दर हाती येत होता. त्यातही मागच्या तीन- चार दिवसांत तीन रुपयांची घट झाली. एकूणच दहा दिवसांत सहा हजारांच्या आसपास पशुखाद्य लागते. या खर्चात शेतातील ओल्या चाऱ्याचा, मनुष्यबळाचा खर्च बेरजेत धरला तर दुग्धव्यवसायातून हाती काय राहते? तर तोटा! हेच एकमेव उत्तर असे गंभिरे यांनी सांगितले.

दावणीला ठेवाव्यात की बाजार दाखवावा?

सूरज गंभिरे सांगत होते. दुधाची जनावरं संगोपन करणे सोप नाही. शारीरिक कष्ट असतात, वेळमर्यादेचं पालन करावं लागतं. पशुखाद्य, आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. असे असताना सध्या मिळणाऱ्या अल्प दूध दराने हाती काहीच शिल्लक उरत नाही. या स्थितीत गायी बाजारात विकाव्यात तर तेथे कवडीमोल भाव मिळतोय. एकूणच कोंडी झाल्याचे गंभिरे यांनी सांगितले.

हेही वाचा : भूमिहीन नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाची योजना; मिळणार शेतीसाठी १००% अनुदान 'असा' करा अर्ज

टॅग्स :दूधशेतकरीशेतीदुग्धव्यवसायमहाराष्ट्रशेती क्षेत्र