Join us

Madgyal Mendhi : माणदेशी माडग्याळ मेंढ्यांना 'या' बाजारात २० हजारांपासून ५ लाखांपर्यंतची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:35 IST

madgyal mendhi bajar धनगर समाजाच्या बांधवांनी मंगळवारी नागपंचमी सणाच्या निमित्ताने भरविलेल्या माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराला महाराष्ट्रासह कर्नाटकातील मेंढपाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सांगोला येथील धनगर समाजाच्या बांधवांनी मंगळवारी नागपंचमी सणाच्या निमित्ताने भरविलेल्या माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराला महाराष्ट्रासह कर्नाटकातील मेंढपाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बाजारात चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्यांना २० हजार रुपयांपासून सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत मागणी झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला.

सांगोल्यातील धनगर समाजाच्या पुढाकारातून मंगळवार, दि. २९ जुलै रोजी नागपंचमीनिमित्त सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माडग्याळ मेंढ्यासह देशी मेंढ्यांचा भव्य बाजार भरवला गेला. यंदा हा बाजार पाचव्या वर्षी होता.

या बाजारासाठी सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्य, तसेच जत, कवठेमहांकाळ, नागज, आटपाडी, सांगली व सातारा जिल्ह्यांतील धनगर समाजाच्या बांधवांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत, वाजत-गाजत मिरवणूक काढून माडग्याळ मेंढ्या व बकरी खरेदी-विक्रीसाठी आणल्या होत्या.

यावेळी काही मेंढपाळांनी मेंढ्यांच्या अंगावर गुलाल व भंडारा टाकला, तर काहींनी मेंढ्यांना झूल पांघरुण फुलांनी सजवले होते. मेंढ्यांच्या वेषभूषेने मेंढपाळांचे लक्ष वेधले.

मंगळवारी दिवसभर सुमारे शेकडो माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे पशुपालक आणि मेंढपाळांनी सांगितले.

बाजाराला जत्रेचे स्वरूपमेंढपाळांनी बाजारात मंडप घालून जत्था-जत्थ्याने मेंढ्यांचा कळप केला होता. हौशी मेंढपाळांनी येथील मेंढ्यांची पारख करून चोचदार मेंढ्यांवर ५ लाखांपर्यंत बोली लावून खरेदी केली, त्यानंतर त्या मेंढ्यांवर गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत हलग्यांचा कडकडाट केला जात होता. बाजाराला माडग्याळ मेंढे व बकरींच्या गर्दीमुळे जत्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते.

अधिक वाचा: ई-मोजणीचे कामकाज कसे चालते? शेतकऱ्यांना ह्याचा कसा फायदा होतोय? वाचा सविस्तर

टॅग्स :शेळीपालनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डसांगलीकर्नाटकमहाराष्ट्रनागपंचमी