Join us

Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:51 IST

जनावरांच्या लम्पी आजाराने अमरावती विभागात पुन्हा शिरकाव केल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर (Lumpy Skin Disease)

Lumpy Skin Disease : 

वाशिम : 

जनावरांच्या लम्पी आजाराने अमरावती विभागात पुन्हा शिरकाव केल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लम्पीची सौम्य लक्षणे असल्याने जनावरांच्या मृत्यूचा धोका नाही. तथापि, पशुपालकांनी बिनधास्त न राहता गोठ्याची नियमित स्वच्छता ठेवावी, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला.

लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सन २०२२-२३ मध्ये राज्यात 'लम्पी'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. गंभीर लक्षणे असलेल्या जनावरांचा मृत्यूही झाला होता. लसीकरण आणि गोठ्याची नियमित स्वच्छता ठेवून लम्पीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात पशुपालक व पशुसंवर्धन विभागाला यश आले होते.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात वाशिमसह अमरावती विभागात पुन्हा लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याचे दिसून येते. मात्र, जनावरांमध्ये लम्पीची गंभीर लक्षणे नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.

वाशिम जिल्ह्यात जवळपास ३० ते ३५ जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली. अमरावती विभागात हा आकडा २०० च्या वर असू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

लम्पी आजाराची लक्षणे सौम्य

जिल्ह्यात काही जनावरांमध्ये लम्पी आजाराची सौम्य लक्षणे दिसून येतात. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. लम्पीसदृश लक्षणे दिसून येताच, नजीकच्या पशु दवाखान्याशी संपर्क साधावा.- डॉ. जयश्री केंद्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वाशिम

काय आहेत लक्षणे?

ताप येणे, त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येणे तसेच तोंडात, घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड येणे, तोंडातून लाळ गळती, अशक्तपणा व भूक मंदावते.

अशी घ्यावी खबरदारी

गोचीड, गोमाश्या यांसह बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यात नियमित फवारणी करावी. गोठा स्वच्छ ठेवावा, जनावरांचे लसीकरण करावे.

 'हे' ही वाचा  

Lumpy Skin Disease : जनावरांतील लम्पी त्वचा रोग वेळीच रोखा करा हे सोपे उपाय

https://www.lokmat.com/agriculture/agri-business/dairy/lumpy-skin-disease-prevent-lumpy-skin-disease-in-animals-with-this-simple-solution-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायगायशेतकरीशेती