नरेंद्र जावरे
परतवाडा : गुजरात व राजस्थान येथून आलेल्या शेळ्या, मेंढ्या म्हशी व उंटांचे रक्त नमुने घेत लसीकरण (Vaccine) केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अचलपूर तालुक्यातील वाढोणा जहागीर येथे उघडकीस आला.
अशावेळी आंतरराज्य सीमेवर पशुधन (Pashudhan) विभागाचे नाके बेपत्ता आहेत. उंटांवरील आजारापासून जनावरेच नव्हे, तर माणसांचा जीवसुद्धा धोक्यात येत असताना, लसीकरण तपासून प्रवेश देण्याचा नियम कागदावर, तर प्रत्यक्ष बेधडक प्रवेश होत आहे.
परिणामी जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पशुपालक रविकिरण पाटील यांनी केला आहे.
जिल्ह्यात एकूण पशुसंख्या ३ लाख ६० हजार आहे. त्यांचे लसीकरण पूर्णतः होणे अजून बाकी आहे. तथापि, पशुसंवर्धन विभागामार्फत गुजरात व राजस्थान येथून आलेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हशी व उंटांचे रक्त नमुने घेत लसीकरण केल्या जात आहे.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या करातून लसीकरणाचा खर्च परराज्यातील पशुंवर केल्या जात असल्याचाही आरोप केला आहे.
अवैध चराई करणाऱ्या परराज्यातील पशुपालकांवर गेल्या २० वर्षांमध्ये एकही कारवाई झाली नसल्याचा आरोप पशुपालक पाटील यांनी केला आहे.
माजीमंत्री बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मेंढपाळाच्या मागण्यासाठी आंदोलन केले होते.
उंटापासून माणसेही धोक्यात
* बाहेरील राज्यातून येणाऱ्या कायम स्थलांतरित जनावरांमुळे स्थानिक जनावरांना पीपीआर, एचएस, थायलेरिया, ट्रिप्स, अॅथ्रेक्स, ब्लूटूंक, बेबीआयसिस हे रोग होऊ शकतात.
* उंट हा ट्रिक्स नावाच्या विषाणूचा वाहक असतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
* जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या पशूचे रक्त नमुने तपासणीकरिता पाठवण्याचा आदेश दिला असताना पशुसंवर्धन विभागाने एकही उंटाचे रक्त नमुने घेतले नाही, असा आरोप पाटील यांनी केला.
ट्रिप्सचे असे होते वहन
* उंटाच्या अंगावर विशिष्ट माशी बसली आणि ती इतर जनावरांवर किंवा माणसांवर बसली तरी त्याला ट्रिप्स नामक आजार होतो.
* हा अतिशय घातक आजार आहे. पावसाळ्यात वातावरण दमट होते त्यावेळी हा आजार होऊ शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
* ते गडचिरोली येथील प्रकरणावरून सिद्ध झाल्याचा दाखला त्यांनी जोडला आहे.
तपासणी नाके बेपत्ता
* जिल्ह्यात आंतरराज्य सीमेवर वरूड, बहिरम व धारणी येथील तपासणी नाके बेपत्ता झाले आहेत. तेथूनच तपासणी होणे गरजेचे आहे. लसीकरण झाले असेल, तरच प्रवेश देण्याचा नियम असताना, परराज्यातील पशूचा बेधडक शिरकाव करून जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आणले जात असल्याचा प्रकार वर्षानुवर्षे होत आहे.
* गेल्यावर्षी पथ्रोटनजीक नयाखेडा, जनोना येथे तब्बल दोन हजार शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला.
राज्यातील जनावरांचे व्हॅक्सिनेशन करण्यापूर्वी जिल्ह्यातील जनावरांचे करावे. विनातपासणी व लसीकरण नसलेल्या जनावरांना प्रवेश नाकारावा, उंटापासून जनावरच नव्हे, तर माणसेसुद्धा धोक्यात येण्याची भीती आहे. तशी तक्रार आपण केली आहे. - रविकिरण पाटील, पशुपालक तक्रारकर्ते, चांदूर बाजार
लसीकरण जिल्ह्यातील जनावरांचेसुद्धा केले जात आहे. परराज्यातून आलेल्या पशुधनाचेसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने केले जात आहे. वॅक्सिंग कमी पडल्यास पुन्हा पुरवठा मागितला जाईल. कुठलेच जनावर सुटणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. - संजय कावरे, पशुसंवर्धन उपायुक्त, अमरावती