Join us

तुमच्या जनावरांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली, तर समजा डिहायड्रेशन झालंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 11:03 IST

जनावरांनाही डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या उद‌्भवू शकते. लक्षणे ओळखून वेळीच उपचार केलेत, तर जनावरापुढील संभाव्य धोका टळू शकतो.

जनावरांच्या शरीर पेशी मध्ये जल/पाणी मोठ्या प्रमाणात असते व याद्वारेच पेशींना आवश्यक खनिज द्रव्यांचा पुरवठा होतो, परंतु जर पशूला संडास लागली, उलट्या झाल्या (रवंथ करणाऱ्या पशूला उलटी होत नाही), अति उष्णता, पिण्याच्या पाण्याची कमतरता, जुने आजार, मूत्रसंस्थेचे आजार, भाजणे या सर्व बाबींमुळे पशूच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते यालाच 'डीहायड्रेशन'असे म्हणतात.

अशी आहेत लक्षणे• पशु रोडावत जातो.• त्याचे डोळे खोल गेल्यासारखे वाटतात.• त्याला लघवी होत नाही किंवा कमी होते.• पशुची त्वचा निस्तेज होते व जर का ही त्वचा ओढून पाहिली तर ती पूर्ववत होण्यास वेळ लागतो म्हणजेच त्वचेची लवचिकता (elasticity) कमी होते.

काळजी आणि उपचारया आजारावर लगेच लक्ष देणे व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे मुळात हा आजार होऊ नये यासाठी पशूला मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.

पशूला अतिउष्णतेपासून संरक्षण द्यावे. विशेषतः उन्हाळ्या मध्ये त्याला गोठ्यात, थंड वातावरणात ठेवावे.जर पशूला पातळ संडास होत असेल तर त्यावर तात्काळ उपचार करावा. 

पशूला आवश्यक असणाऱ्या खनिज पदार्थांचा नियमित पुरवठा करावा.

या आजाराचे लक्षणे आढळताच पशूच्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मीठ, साखर टाकावे. नारळ पाण्याचा वापर करावा.

या आजारावर तात्काळ पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करावेत, कारण हा आजार जीव घेणार ठरू शकतो.

-डॉ. सुधीर राजुरकरप्रमुख, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी

(लेखक पशुवैद्यक शास्त्रातील औषधी व विषशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :गायदुग्धव्यवसायशेतकरी