Join us

बिबटे अधिवासच विसरले.. पण कशामुळे? मानवाशी वाढला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:03 PM

गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कन्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे.जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वतःचा अधिवास मानलाय.

संजय पाटीलकऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शिवारातच नव्हे, तर अगदी घरातही त्यांनी शिरकाव केलाय. सध्या तरी खबरदारी घेणं एवढंच प्रत्येकाच्या हातात आहे; पण बिबट्यांचा हा वाढता उपद्रव मानव आणि बिबट्याच्या संघर्षाची नांदीच म्हणावी लागेल. 

बिबट्या हे हिंस्त्र श्वापद; पण चोरटा शिकारी. रानडुक्कर, श्वान, शेळ्या, मेंढ्या हे त्याचं प्रमुख खाद्य. शिवारात हे खाद्य त्याला मुबलक प्रमाणात मिळतं. नाहीच मिळालं तरी प्रसंगी खेकडेही तो खातो. कोणत्याही मार्गाने तो आपली भूक भागवतो.

त्यातच गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे.जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वतःचा अधिवास मानलाय. त्यामुळे शासनाने व्यापक मोहीम राबवून जरी बिबट्यांना जेरबंद करीत जंगलाच्या अधिवासात सोडले तरी ते पुन्हा शिवारातच वावरतील, अशी भीती प्राणीतज्ज्ञांना आहे.

कऱ्हाडसह पाटण तालुक्यात सध्या जेवढे बिबटे वावरताहेत तेवढे बिबटे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही नाहीत. प्रकल्पातील बिबट्यांची संख्या पन्नास आहे, तर कऱ्हाड, पाटणच्या प्रादेशिक वनहद्दीत आणि शिवारात शंभरपेक्षाही जास्त बिबटे असावेत, असे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले. 

तर बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आताच हालचाली झाल्या नाहीत, तर जुन्नरसारखीच कऱ्हाड, पाटणची भविष्यातील परिस्थिती गंभीर असेल, अशी भीती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक नाना खामकर आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केली आहे.

बिबट्याप्रवण क्षेत्र वाढलेप्रादेशिक वन विभागाच्या क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर अधोरेखित झालाय किवा बिबट्याने शिकार केलीय, अशी ठिकाणे बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून वन विभागाकडे नोंदली जातात. कऱ्हाडसह पाटण तालुक्यात गत काही वर्षात या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे.

उपाशी बिबट्यांचा धोका अधिकबिबट्या उपाशी असेल तर तो हिंस्र बनतो. भक्ष्याच्या शोधात तो फिरत असतो, भक्ष्य नाही मिळाले तर मानवी वस्तीनजीक पाळीव जनावरांवर तो हल्ला चढवतो. दोन ते तीन दिवसांत एकदाच तो शिकार करतो, असेही प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.

जंगल हा अधिवासच बिबट्या विसरले आहेत. उसाचे शेत हेच जंगल असल्याचा आनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील प्रादेशिक वनहद्दीत शंभरपेक्षा जास्त बिबटे असावेत. - नाना खामकर, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो

बिबट्याप्रवण क्षेत्र वाढले आहे. वारंवार हल्लेही होत आहेत. बिबट्यांची वाढणारी संख्या सध्या दोन्ही तालुक्यांसाठी धोक्याची घंटा आहे. या वाढत्या संख्येला वेळीच नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, शासनाने व्यापक मोहीम हाती घ्यावी. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड

टॅग्स :बिबट्याशेतीशेतकरीगायकराडपाटणसाताराजंगलवनविभाग