Budget 2026 : शेतीच्या तुलनेत दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन दुप्पट दराने वाढत आहे. हे लक्षात घेऊन, २०२६ च्या अर्थसंकल्पात एक घोषणा करण्यात आली आहे. पशुपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनातील वाढत्या रोग आणि संसर्ग दराच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पशुवैद्यकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडे हवामान, चाऱ्याची कमतरता यासह इतर अनेक गोष्टीमुळे जनावरांना आजारांना बळी पडावे लागते. मात्र यासाठी पशु वैद्यकांची, पशुधन विकास अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे वेळेवर जनावरांवर उपचार होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे देशात जनावरांची संख्या अधिक असून त्यामानाने पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी आहे.
पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात ४० हजार ६०३ मंजूर पशुवैद्यकीय पदे आहेत. त्या तुलनेत, रिक्त पदांची संख्या १० हजार ४७४ आहे, जी अंदाजे २५ टक्के आहे. यापैकी, एकट्या सात प्रमुख राज्यांमध्ये अंदाजे ७ हजार डॉक्टरांची कमतरता आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सर्वात मोठी कमतरता आहे.
महाराष्ट्रात २ हजार १६५ रिक्त पशुवैद्यकीय पदे आहेत, राजस्थानमध्ये १,३६७ आणि कर्नाटकमध्ये १,१३६ पदे रिक्त आहेत. शिवाय, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहारमध्येही लक्षणीय कमतरता आहे. उत्तर प्रदेशात ५६०, पंजाबमध्ये ५६०, गुजरातमध्ये ९२३ आणि बिहारमध्ये ८६० आहेत.
