राहुल भडांगे
शेळ्या-मेंढ्यांचे पालन करणाऱ्या पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जनावरांच्या पोटातील जंतांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता निसर्गाच्या सोबतीने आधुनिक विज्ञानाची जोड मिळाली आहे.(Shelyanchya Jantavar Upay)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (MAFSU) सहयोगी प्राध्यापक डॉ. चेतक पंचभाई यांनी एक 'स्मार्ट हर्बल गोळी' विकसित केली असून, या संशोधनाला भारत सरकारकडून नुकतेच पेटंट बहाल करण्यात आले आहे.(Shelyanchya Jantavar Upay)
जंतांचा प्रश्न आणि रासायनिक औषधांची मर्यादा
ग्रामीण भागात शेळी-मेंढी पालन हा लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, जनावरांच्या पोटातील जंतांमुळे पशुपालक नेहमीच चिंतेत असतात.
आतापर्यंत जंत नियंत्रणासाठी रासायनिक 'अँथेलमिटिक' औषधांचा वापर केला जात होता. परंतु, या औषधांचा अतिवापर झाल्याने जंतांनी त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती (Resistance) निर्माण केली होती. परिणामी, औषध देऊनही जनावरे अशक्त होण्याचे आणि उत्पादन घटण्याचे प्रमाण वाढले होते.
काय आहे 'स्मार्ट हर्बल गोळी'?
डॉ. पंचभाई यांनी आयुर्वेदातील निवडक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून ही गोळी तयार केली आहे. या संशोधनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची त्वरीत परिणाम करते. (Targeted Action)
पीएच डिपेंडंट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम
ही गोळी जनावरांच्या पोटात गेल्यावर कुठेही विरघळत नाही. ती थेट पोटाच्या चौथ्या कप्प्यात, ज्याला 'ॲबोमॅसम' (Abomasum) म्हणतात, तिथेच जाऊन सक्रिय होते.
नेमका प्रहार
जंतांचा प्रादुर्भाव याच भागात सर्वाधिक असतो. गोळी नेमकी तिथेच विरघळत असल्याने औषधाचा थोडा डोसही अत्यंत प्रभावी ठरतो.
शून्य अपव्यय
साध्या औषधांचा बराचसा भाग शरीरात इतरत्र विरघळून वाया जातो, मात्र या तंत्रज्ञानामुळे औषधाचा पूर्ण वापर होतो.
पशुपालकांना होणारे फायदे
* या हर्बल गोळीमुळे केवळ जंतांचा नायनाट होत नाही, तर जनावरांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
उत्पादन वाढ
जंतमुक्त झाल्यामुळे जनावरांची भूक वाढते, पर्यायाने दूध आणि वजनात मोठी वाढ होते.
रोगप्रतिकारशक्ती
ही गोळी नैसर्गिक घटकांपासून बनलेली असल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती सुधारते.
कमी खर्च
रासायनिक औषधांच्या तुलनेत हा उपाय स्वस्त आणि सुरक्षित आहे.
दुष्परिणाम नाही
पूर्णपणे हर्बल असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
ही गोळी जनावरांच्या पोटातील विशिष्ट भागात (ॲबोमॅसम) जाऊन काम करते, जिथे जंतांचा मुख्य अड्डा असतो. यामुळे औषध वाया जात नाही आणि जंत त्वरित नष्ट होतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल.- डॉ. चेतक पंचभाई, संशोधक
भारत सरकारकडून २० वर्षांचे पेटंट
डॉ. चेतक पंचभाई यांच्या या कल्पक संशोधनाची दखल घेत भारत सरकारने २७ मार्च २०२६ रोजी याला २० वर्षांसाठी पेटंट मंजूर केले आहे.
या संशोधनामुळे आता जागतिक स्तरावर भारतीय पशुवैद्यकीय शास्त्राचा दबदबा निर्माण झाला असून, लवकरच ही गोळी व्यावसायिक स्तरावर पशुपालकांसाठी उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Animal Healthcare : पशुपालकांसाठी मोठी खुशखबर; आता मिळणार 'डबल' सुविधा!
