चंद्रपूर : गुडसेला येथील युवा पशुपालक शेतकरी प्रशांत माधव मोरे यांनी पावसापासून २५ बकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोत्यांपासून तयार जणू रेनकोट (Raincot For Goats) तयार केली. या बकऱ्यांची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
सध्या पावसाळा (Rainy Season) सुरू आहे. झळ सुरू असली की शेतकऱ्यांना शेतातील कामे करणे कठीण होते. शिवाय. गाय, बैल व बकऱ्यांना चारायला घेऊन जाणे हेदेखील खूप कष्टाचे व त्रासदायक आहे. पावसात बकऱ्या भिजल्या तर त्यांना सर्दी, खोकला होतो. आजारी पडू नये म्हणून तालुक्यातील प्रशांत मोरे यांनी नवीन शक्कल शोधून काढली. आपल्या पंचवीस बकऱ्यांना प्लास्टिक कव्हर असलेल्या पोत्यांचा रेनकोट सारखा वापर केला.
शेतीला बकरी पालनाची जोड प्रशांत मोरे हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तीन वर्षापासून बकरी पालनाचा व्यवसाय करीत आहे. शेतकऱ्यांनी केवळ कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांवर अवलंबून न राहता बकरी पालनासारखा व्यवसाय करावा. यातूनही उत्पन्न चांगले मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.
जिवती तालुका हा जंगलव्याप्त भाग आहे. बकरी पालन व्यवसायाला मोठी संधी आहे. ज्या बकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळते त्यांना अल्प खर्चात पावसापासून सुरक्षित ठेवणे कर्तव्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.