संतोष वानखडे
राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. (Pashudhan Scheme)
दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन आणि इतर प्राणिपालन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करता यावी, यासाठी शासनाकडून अनुदानाचा हात पुढे करण्यात आला आहे. (Pashudhan Scheme)
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरु केलेल्या विविध योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ मेपर्यंत राज्यभरातून एकूण १ लाख ८२ हजार ०७७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
विविध योजनांमध्ये दुधाळ गायी/म्हशी, शेळी/मेंढी, मांसल कुक्कुट पक्षी, तलंगा गट व सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट अशा योजनेचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जून २०२५ असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेवटच्या टप्प्यात अर्ज संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असून लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
अनुदानाचे प्रमाण
अनुसूचित जाती व जमातीसाठी: ७५% अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ५०% अनुदान
राज्यस्तरीय योजनांवरील अर्ज (एकूण)
योजना | अर्ज संख्या |
---|---|
दुधाळ गायी/म्हशी वाटप | ६४,७९२ |
शेळी/मेंढी वाटप | ५२,७८४ |
१००० मांसल कुक्कुट पक्षी | १३,०५८0 |
जिल्हास्तरीय योजनांवरील अर्ज
योजना | अर्ज संख्या |
---|---|
दुधाळ गायी/म्हशी वाटप | २०,६६४ |
शेळी/मेंढी वाटप | २२,०१७ |
तलंगा गट वाटप | ४,४९४ |
सुधारित पक्ष्यांच्या पिलांचे गट | ४,२६८ |
टॉप १० जिल्हे
जिल्हा | अर्ज संख्या |
---|---|
बीड | १९,६२५ |
अहिल्यानगर | १४,३२३ |
सोलापूर | ११,३३६ |
बुलढाणा | १०,७४१ |
जालना | १०,११५ |
यवतमाळ | ८,८५३ |
पुणे | ७,४९९ |
छ. संभाजीनगर | ७,३५५ |
परभणी | ६,७४३ |
नांदेड | ६,५७५ |