नाशिक : पहिल्यांदाच राज्यस्तरीय पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वावी उपबाजार आवारात ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात देशभरातील विविध प्रजातींचे पशुधन एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे.
महोत्सवात डेअरी, पोल्ट्री, पशुपालन क्षेत्राशी संबंधित स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात होत असलेले हे प्रदर्शन तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरणार असून या पशू महोत्सवाला शेतकरी, पशुपालक, पशूप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन ; विजेत्यांना रोख बक्षिसे
प्रदर्शनात दुधाळ गायींची मिल्किंग स्पर्धा, कालवडींची ब्युटी स्पर्धा, देशी गाय, बैल, घोडा गट, शेळी-मेंढी, कोंबडी, पक्षी गट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाची मिळणार माहिती
पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, पशुवैद्यकीय औषधे, मिल्किंग मशीन, पोल्ट्री मशीनरी, रबर मॅट्स तसेच शेळी-मेंढी पालनाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने शेतकरी वर्गाला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलबध करुन दिली जाणार आहे.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण
गीर, पुंगनूर, खिलारी, थारपारकर, डांगी, काठीयावाड, लालसिंधी, गावरान गायी, शर्यतीचे बैल, उत्कृष्ट बैलजोडी, घोडे, संकरित गायी, विविध जातींच्या शेळ्या-मॅढ्या, कोंबडी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.
