Agriculture News : राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची प्रभावी डेटा व्यवस्थापनासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत, गट, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (PNO):
पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील पशुधन पर्यवेक्षक यांना ते कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावासाठी "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी यांना संबंधित गावातील पशुधनाची जन्म, मृत्यु, खरेदी विक्री यामुळे पशुधनाच्या संख्येत होणारा बदल व आजार याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी त्या गावातील "ग्रामविकास अधिकारी" यांची राहील.
गट स्तर (Cluster level) वरील "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (CNO) :
पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील "पशुधन विकास अधिकारी" यांना पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांसाठी गट पातळीवरील (Cluster level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. सदर अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत स्तरावरील राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (PNO) यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतील.
तालुका स्तर (Block level) वरील "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (BNO) :
पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांना तालुका पातळीवरील (Block level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
जिल्हा स्तर (District level) वरील "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (DNO) :
पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या उपायुक्त पशुसंवर्धन यांना जिल्हा पातळीवरील (District level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" नियुक्त करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय वरील (State level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" (SNO) :
आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयातील सह आयुक्त पशुसंवर्धन (पशुरोग नियंत्रण) यांची राज्यस्तरीय (State level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. याकामात सहाय्यक आयुक्त, एकात्मिक नमुना सर्वेक्षण (Integrated Sample Survey) व सहाय्यक संचालक (साख्यिकी) आणि प्रकल्प व्यवस्थापन युनिट (PMU) हे राज्यस्तरीय वरील (State level) "राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी" यांना राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांसंबधीच्या कामकाजात सहाय्य करतील.
