- विलास चिलबुले
गडचिरोली : संकटकाळात धैर्याने उचललेली पावले अनेकदा यशाचे दरवाजे उघडतात. कोरोना काळात रोजगाराचे दरवाजे बंद होत असताना आरमोरी येथील ताडूरवार नगरातील पशुपालक तथा शेतकरी यादव अंताराम बोरकर यांनी पत्नी व मुलासोबत दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
आधीच असलेल्या म्हशींच्या दूधविक्रीच्याव्यवसायाला जोड देत इतरही पशुपालकांकडून दूध खरेदी सुरू केली. आज त्याच ध्यासाने त्यांना वर्षाला चार ते पाच लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. बोरकर कुटुंबाची दुग्ध व्यवसायातील ही यशोगाथा परिसरात प्रेरणादायी ठरली आहे.
यादव बोरकर यांच्या कुटुंबाकडे सध्या नऊ म्हशी आहेत. घरातून दररोज सुमारे ३० लिटर दूध उत्पादन होते; परंतु वाढत्या मागणीमुळे ते परिसरातील इतर दूध उत्पादकांकडून ८०० लिटर दूध प्रतिदिन खरेदी करतात. प्रतिलिटर ५० रुपये दराने खरेदी होणाऱ्या या दुधाचे पॅकिंग करून तसेच दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्याची विक्री आरमोरी, गडचिरोली आणि आसपासच्या परिसरात करतात.
या कामात त्यांना पत्नी अलका बोरकर व मुलगा राहुल बोरकर यांचे सहकार्य लाभते. चांगल्या दर्जामुळे त्यांच्या दुधाला कायमच मागणी असते. कोरोना काळातील आर्थिक अनिश्चिततेत 'काहीतरी करायचेच' असा निर्धार करून सुरू केलेला हा व्यवसाय आज स्थिर उत्पन्न देणाऱ्या उपजीविकेचे रूप घेऊन उभा आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या शहरांपर्यंत विस्तारला असून बोरकर कुटुंबाने सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कमी खर्चात अधिक उत्पादनावर भर
वयाची साठ वर्षे गाठलेल्या यादव बोरकर यांच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. या जमिनीतून ते जनावरांसाठी आवश्यक चारा स्वतः तयार करतात. पशुपालनासाठी लागणारा खर्च कमी करण्याचे हे मॉडेल गावातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
पती, पत्नी आणि मुलगाही तिन्ही मंडळी मिळून व्यवसायातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात. दुधाची संकलनव्यवस्था, उत्पादने, पॅकिंग, विक्री प्रत्येक टप्प्यावर बोरकर कुटुंबाची नितांत मेहनत आणि सचोटी दिसून येते.
दुग्धजन्य पदार्थांनाही मागणी
फक्त दूधविक्रीवर न थांबता बोरकर कुटुंबाने दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनाकडेही मोर्चा वळवला. ताक, तूप, खवा, श्रीखंड, पनीर अशी सर्व उत्पादने ते स्वतः तयार करतात. विशेष म्हणजे, त्यांचे पनीर मोठ्या शहरांतही चांगल्या प्रमाणात विकले जाते. सातत्याने वाढत असलेली मागणी त्यांच्या कामाची गुणवत्ता सांगून जाते.
