- मुखरू बागडे
भंडारा : शेती व शेतीला पूरक नव्हे तर जोडधंदा (मुख्य व्यवसाय) म्हणून दुग्धव्यवसाय दिवसेंदिवस प्रगतीत येत आहे. मात्र, या प्रगतीला जिद्द व मेहनतीची जोड अत्यंत महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसायाला दररोज कष्टाची व नित्य नियोजनाची नितांत गरज महत्त्वाची ठरली आहे.
ईश्वर हेमने या उमद्या तरुणाने दुग्धव्यवसायात इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःला सिद्ध केले आहे. दररोज ६० लिटर दुधाचे उत्पन्न घेऊन ३५ रुपये दराने विक्री करीत खर्च वगळता जवळपास दीड हजार रुपये रोज नगदी कमवून नवा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवला आहे.
सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधात गाव सोडून शहरात स्थलांतरित होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गावात आता काही उरले नाही म्हणत, म्हाताऱ्या आई-वडिलांना गावातच सोडून शहराच्या दिशेने धाव घेत आहेत. खेडी ओस पडून शहरात कबुतराच्या घरट्यासारखे घरात जीवन जगणारे अधिक आहेत.
मात्र, ईश्वरने स्वतः परिश्रम करण्याची तयारी दर्शवीत वडिलोपार्जित राहत्या घरीच दुग्धोत्पादन सुरू करण्याचा निश्चय केला. बघता बघता त्याला त्याच्या आयुष्याच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दुग्धोत्पादनातच दिसली अन् म्हणता काय, ईश्वरने चांगलीच धवलक्रांती केली.
गोठ्यात २५ जनावरे, दररोज होते ६० लिटर दुधाचे उत्पन्न
अगदी एका गायीपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय आज २५ जनावरांपर्यंत आलेला आहे. यात ८ गायी, ५ म्हशी व १२ छोटे जनावरे आहेत. यातून समृद्धीचा मार्ग गवसला आहे. दोन वेळच्या दूध काढणीतून ६० लिटर दूध मिळते. किमान ३५ रुपये दराने दूध विक्री होते. २१०० रुपये मिळतात. खर्चात ८०० रुपये लागतात. निव्वळ नफा १३०० रुपये दिवसाला होतो. वर्षाला ४ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा निव्वळ नफा उरतो.
तरुणांनो, शेतीतही करिअर घडू शकते
होय, जिज्ञासा व प्रामाणिकता जपल्यास शेतीत व दुग्धोत्पादनातसुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते.
शेतीला इतर जोडधंद्याची जोडणी करा. कृषी विभागाशी मैत्री साधा. शासनाच्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून लाभ घ्या. निश्चितच शेतीतही करिअर घडू शकते, हे मी आत्मविश्वासाने सांगतो.
- ईश्वर महादेव हेमने, खोलमारा