Lumpy Skin Disease : मलकापूर शहरातील सालीपुरा प्रभागात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. ३० जून रोजी लम्पीची लक्षणे आढळलेल्या दोन जनावरांपैकी एका बैलाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या गायीवर उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी
लम्पीच्या प्राथमिक लक्षणांची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. जनावरांची तपासणी करून बाधित गायीवर उपचार सुरू करण्यात आले. मृत बैलाचे शव विलगीकरण करून योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले, तसेच परिसर निर्जंतुक करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
मागील वर्षी ६५० हून अधिक जनावरांना लसीकरण
मागील वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ६५० हून अधिक गुरांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, यंदाही रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा लसीकरण मोहीम तातडीने राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
लम्पीची लक्षणे ओळखा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांना जनावरांमध्ये लम्पीची खालील लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
* डोळे व नाकातून पाणी येणे
* लसिका ग्रंथींची सूज
* दूध उत्पादनात घट
* चारा व पाणी घेण्यास अनिच्छा
*तोंड, डोळ्यांभोवती व्रण तयार होणे
* पाय सुजून लंगडणे
काळजी घेणे का गरजेचे?
लम्पी त्वचारोग हा संसर्गजन्य असून योग्य विलगीकरण आणि स्वच्छता न राखल्यास वेगाने पसरतो. विशेषतः लहान व दुर्बल जनावरांसाठी हा घातक ठरतो. त्यामुळे वेळेवर निदान व लसीकरण महत्त्वाचे आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भोळे यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे पशुपालकांना आवाहन
* पशुपालकांनी आपल्या गोठ्यांत स्वच्छता ठेवावी, बाधित जनावरांना वेगळे ठेवावे आणि कुठलीही लक्षणे दिसल्यास तातडीने माहिती द्यावी.
* लसीकरणासाठी विभागाकडून मोहीम राबविली जाणार असून पशुपालकांनी सहकार्य करावे.
* लम्पीवर उपचार शक्य असून योग्य वेळी काळजी घेतल्यास जनावरांचे प्राण वाचविणे शक्य आहे.
* त्यामुळे पशुपालकांनी भीती न बाळगता जागरूक राहावे आणि लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.
लम्पी त्वचारोगावर उपाययोजना
लसीकरण (Vaccination) : लम्पीचा प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वेळेवर लसीकरण. बाधित भागात लसीकरण मोहीम तातडीने राबवली जाते. पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
विलगीकरण (Isolation) : लक्षणे दिसलेल्या जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे, जेणेकरून रोग पसरणार नाही.
स्वच्छता व निर्जंतुकीकरण (Hygiene & Disinfection) : गोठ्यात व आसपास स्वच्छता राखावी. गोठ्याचे जमिन व भिंती, खुराडे व उपकरणे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावीत.
माशी-मच्छरांचा नायनाट (Vector Control) : लम्पीचा प्रसार माशी, मच्छर, गोचीड यामुळेही होतो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे.
औषधोपचार (Treatment & Care) : लम्पीवर थेट औषध नाही. मात्र, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करून संसर्गाची तीव्रता कमी करता येते. अँटीबायोटिक्स, वेदनाशामक व मलम यांचा उपयोग केला जातो.
पोषक आहार व पाणी (Nutrition) : आजारी जनावरांना पौष्टिक आहार व स्वच्छ पाणी पुरवावे, जेणेकरून त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल.
निगराणी व तत्काळ माहिती (Monitoring) : गावात किंवा परिसरात लक्षणे दिसल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.
लम्पीवर उपचार शक्य आहेत. जनावरांना लसीकरण करून संरक्षण देता येते. विशेषतः लहान व दुर्बल जनावरांसाठी हा रोग अधिक घातक आहे. त्यामुळे वेळेवर निदान आणि लसीकरण गरजेचे आहे.- डॉ. गजानन भोळे, पशुवैद्यकीय अधिकारी, मलकापूर
हे ही वाचा सविस्तर : Chillies Market : हिरव्या मिरचीने भरली शेतकऱ्यांच्या खिशात गोडी वाचा सविस्तर