यशवंत परांडकर
शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली की बळीराजाचा संसार कसा सावरतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कामठा (खुर्द) येथील ऐतिहासिक म्हैस बाजार. (Kamtha Khurd Buffalo Market)
१९९० पासून अखंड सुरू असलेला हा बाजार गेल्या ३५ वर्षांत विश्वासार्हतेची भक्कम परंपरा निर्माण करत दर रविवारी भरतो आणि महिनाअखेर तब्बल ५० ते ६० कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडतो. (Kamtha Khurd Buffalo Market)
महाराष्ट्राबाहेरही ख्याती
नांदेड तालुक्यातील या बाजाराची ख्याती आता राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेश पर्यंत पोहोचली आहे. हैदराबाद, इंदूर, धुळे, निजामाबाद, खामगाव आदी भागांतून व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.
'व्यापारात पारदर्शकता आणि फसवणुकीला नाही थारा' हीच या बाजाराची ओळख असल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष जयराम पाटील यांनी सांगितले.
दर्जेदार पशुधनाला मागणी
दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी दर्जेदार पशुधनाकडे वळत आहेत. बाजारात सध्या खालील जातींची विशेष मागणी आहे:
मुरा (Murrah) – ४ ते ६ लिटर दूध
जाफरी (Jaffrabadi) – ६ ते ७ लिटर दूध
मसान – ५ ते ६ लिटर दूध
सोलापुरी – ४ ते ५ लिटर दूध
गावरान – ३ ते ४ लिटर दूध
दूध उत्पादन क्षमतेनुसार म्हशींचे दर ठरतात.
सध्याचे बाजारभाव (अंदाजे)
उच्च दूध देणारी म्हैस : १.२० लाख ते २ लाख रु.
जाफरी : १ लाख ते १.५० लाख रु.
मुरा : १ लाख ते १.२० लाख रु.
सोलापुरी/गावरान : ७५ हजार ते १.५० लाख रु.
महागाईमुळे चारा महाग झाला आहे. शासनाने दूध उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी. - विश्वनाथ कनगिरे, शेतकरी, गणपूर कामठा
माझ्याकडे जाफरी म्हैस असून ती सुमारे सात लिटर दूध देते. कामठा बाजारातील व्यवहार पारदर्शक असल्याने आम्ही येथेच खरेदी करतो. - अमृत जाधव, शेतकरी, खुरगाव
मुरा, गावरान आणि जाफरी म्हशींमुळे कुटुंबाला आधार मिळाला. दूध व्यवसायामुळे उत्पन्नात स्थैर्य आले आहे.- राजू पांचाळ, शेतकरी, नांदुसा
'दूधसागर' ठरलेला बाजार
कामठा खुर्दचा हा बाजार केवळ व्यवहारापुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा केंद्रबिंदू ठरला आहे. वाढती उलाढाल, दर्जेदार पशुधन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे हा बाजार शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे द्वार बनला आहे.
दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून, योग्य शासकीय मदत मिळाल्यास हा 'दूधसागर' आणखी विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
