स. सो. खंडळकर
छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे दूध संकलन दिवसेंदिवस घटत चालले आहे. खासगी डेअऱ्यांची आक्रमक घुसखोरी आणि गुजरातमधील ‘पंचमहल दूध संघा’चे थेट संकलन यामुळे संघाच्या आकड्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. (Farmers Milk Supply)
पंचमहल डेअरीची आक्रमक मोहीम
गुजरातच्या पंचमहल जिल्हा दूध संघातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दररोज तब्बल ३ ते ३.५ लाख लिटर दूध संकलित केले जात आहे. कन्नड, खुलताबाद, फुलंब्री तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात दूध पंचमहल डेअरीकडे वळविले जात आहे. या भागातील वाहेगाव, खुलताबाद व फुलंब्री डेअऱ्यांमार्फत हे दूध संकलित करून थेट गुजरातला पाठवले जाते.
दूध संकलनातील घट
२०२०-२१ : ७८,४९९ लिटर/दिवस
२०२१-२२ : ६८,५२१ लिटर/दिवस
२०२२-२३ : ५९,९६८ लिटर/दिवस
२०२४-२५ (सुरुवात) : ६२,३९० लिटर/दिवस
सध्या (ऑगस्ट २०२५) : ५७,२९२ लिटर/दिवस
जुलै २०२५ मध्ये संकलन ५८,६४१ लिटर होते, तर ऑगस्टमध्ये ते आणखी घटून ५७,२९२ लिटरवर आले आहे.
खासगी डेअरी विरुद्ध जिल्हा संघ
जिल्हा दूध संघाच्या तुलनेत खासगी डेअऱ्या उत्पादकांना आकर्षित करत आहेत.
दरातील फरक – खासगी डेअऱ्या एखाद रुपया का होईना अधिक दर देतात. जिल्हा संघात दरवाढ संचालक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असते, जी प्रक्रिया अनेकदा महिन्याभर उशिरा पूर्ण होते.
नियम सैल – खासगी डेअऱ्यांना दूध गोळा करण्यासाठी सरकारी परवानगी लागत नाही. त्यामुळे ते खराब व भेसळयुक्त दूधही संकलित करतात.
प्रलोभने – जास्त दूध पुरवणाऱ्या उत्पादकांना खासगी डेअऱ्या अतिरिक्त १ ते २ रुपये कमिशन व आगाऊ रक्कम देतात.
जुनी पद्धत बंद – काही संचालक आपल्या डेअऱ्यांच्या आकडेवारीत फुगवटा करत होते, परंतु आता ते शक्य न राहिल्याने संकलनाचे खरे आकडे समोर येत आहेत.
उपाययोजनांची गरज
उत्पादक संघाचे संकलन सतत घटत असल्याने भविष्यात अस्तित्व टिकवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेत निर्णयप्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा देणे ही संघासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. अन्यथा खासगी व बाहेरील डेअऱ्यांचा दबदबा वाढत राहील, अशी भीती जाणकार व्यक्त करतात.