Animal Nutrition In Winter : जनावरांना रात्री गोठ्यात ठेवावे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठा कोरडा ठेवावा. लहान करडे / कोकरे/वासरे यांचे सध्याच्या थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेले जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनावरांच्या गोठ्यांना बारदान / शेडनेटचे पडदे लावावेत.
तसेच गोठय़ामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० व्हॅटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावीत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. गाभण जनावरांना व छोटया जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत / कडबा / गोणपाट यांची बिछायत टाकावी. गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
त्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा. थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे. विशेषतः गाभण गायी-म्हशींची जास्त काळजी घ्यावी. जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड/ सरळी पेंड यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास पेंड/ सरळी पेंड यांचा वापर वाढवावा.
शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा. क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा. चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे, जेणेकरून गवतावर दहिवर नसेल. गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
