- रविंद्र शिऊरकर
राज्यात चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांना जनावरे बाजारात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. आठवडी बाजारात गायी म्हशींची बाजारात मोठी आवक होत आहे. मागणी कमी असल्याने जनावरांना कवडीमोल भाव मिळत होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे भरलेल्या जनावरांच्या बाजारात खरेदीदारांमध्ये वाढ झाली असली तरी बाजारभावात काहीशी वाढ दिसली. अवकाळी पावसाने पुन्हा चारा उत्पादन वाढण्याच्या आशेने पुन्हा एकदा शेतकरी गाईंची खरेदी करतांना दिसून आले.
अनेक भागांना मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने मोठा फटका बसला. काही पिकांना दिलासादायक तर काही पिकांची नासधूस करणारा हा पाऊस ठरला. अवकाळी पावसामुळे शिवारातील चारापिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे मात्र आता ज्वारी तर काही भागात मुरघास करिता कमी दिवसांत परिपूर्ण होणारी आफ्रिकन टॉल मक्याचा चारा घेताना शेतकरी दिसत आहे.
दूध दरात चढउतार होत असताना गाईंना लाखात मागणी
सध्या सगळीकडे दुधाचे दर कमी असतानादेखील बाजारात शेतकरी गाई खरेदी करतांना दिसून आले. गेल्या महिनाभराच्या तुलनेत सध्या बाजार भाव हवे तेवढे वाढले नाहीत. डिसेंबरपासून थंड पेयांची विक्री होते व ईद पर्यँत दुधाची मागणी देखील वाढते. ज्यामुळे दुधाचे दर पुढील काळात सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दर वाढण्याच्या आत गाय म्हैस खरेदी करणे परवडणार नसल्याने आता खरेदी करून ठेवणार आहोत, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
गेल्या बाजाराच्या तुलनेत आज शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतांना दिसत आहेत. मात्र, त्या तुलनेत विक्री करणारे फक्त व्यापारी अधिक आहेत. त्यामुळे आजचा बाजारभाव सुधारले आहेत. तसेच या पुढे एक दोन महिने बाजारभावात तेजी राहील अस वाटतंय. - किरण तळेकर व्यापारी कोपरगाव बाजार