Join us
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांतील युद्धाचा परिणाम; पशुआहार महागल्याने दुधाळ जनावरांना सांभाळणे होतंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:30 IST

Dairy Feed Rate : पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून जव्हार भागातील शेतकरी कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळू लागला आहे. या व्यवसायामुळे स्थलांतर कमी होत येथील तरुणाईला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र, सध्याच्या महागाईत दुधाळ जनावरांना देण्यात येणारा पशुआहार महागल्याने येथील शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे.

पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे. पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. येथील दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय म्हणून केला जातो.

या व्यवसायावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. पशुगणनेनंतर हा आकडा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात म्हैस आणि संकरित गायीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, दूध उत्पादक शेतकरी सध्या पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे पशुखाद्य महागले आहे. मात्र, दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ घालणे चांगलेच जिकिरीचे झाले आहे. त्यातच सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या देखभालीनेही मेटाकुटीला आलो आहे. पर्यायी व्यवसायाचा शोध घ्यावा का, या विचारात आहे. - आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक.

पशुखाद्याचा भाव

• कडबा सिंगल कट्टी - २,५०० ते २,८००.  • मुरघास - ८,००० ते १०,००० प्रतिटन.  • सरकी पेंड - १,२०० ते १,४०० प्रति ४० किलो.  • शेंग पेंड - १,३०० ते १,७०० प्रति ४० किलो. • मका कुट्टी - १,१५० प्रति ४५ किलो. 

खाद्याच्या तुलनेत दुधाला भाव अपुरा

वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा भावही अत्यंत कमी आहे. सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार किमान ६० रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाचा भाव किमान ५० रुपये प्रतिलिटर आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतीच्या तुलनेत हा भाव अगदी अपुरा आहे.

शेतकऱ्यांनी सरकारकडे दूध भाववाढ करण्याची आणि अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळण्याची मागणी केली आहे. दूध भावात सुधारणा झाली नाही, तर अनेक पशुपालक शेतकऱ्यांचा हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

English
हिंदी सारांश
Web Title : War's Impact: Costly Animal Feed Troubles Maharashtra's Dairy Farmers

Web Summary : Rising animal feed prices, fueled by global conflict, are squeezing dairy farmers in Maharashtra's Jawhar region. Despite consistent milk prices, increased feed costs make sustaining their businesses challenging, threatening livelihoods. Farmers seek government support to survive this crisis.
टॅग्स :दूधदुग्धव्यवसायशेती क्षेत्रशेतकरीगायशेती