Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुध उत्पादन वाढविण्यासाठी दुधाळ जनावरांची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:20 IST

पाण्याची उपलब्धता यामुळे हिवाळ्यात थंड वातावरण असते. मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा. हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतलीतर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे.

हिवाळा हा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे. पाण्याची उपलब्धता यामुळे हिवाळ्यात थंड वातावरण असते. मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा. हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतलीतर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे.

- या ऋतुत जनावरांच्या चयापचयाची, शरीरक्रियांची गती कमी होऊ नये म्हणून उर्जायुक्त आहार जनावरांना देणे गरजेचे असते.- हिवाळ्यातील गार वारे व थंडीमुळे जनावरांना फुफ्फुसदाह, श्वसनाचे विकार होतात. आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे. यासाठी जनावरांचा थंडीपासून बचाव करावा.- उबदारपणा राहण्यासाठी गोठ्यामध्ये जास्त शक्तीचे विद्युत दिवे लावावेत. गोठ्याच्या जाळीला पोते बांधावे. त्यामुळे गोठ्यामध्ये गार हवा येणार नाही.- सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जनावरांना बांधावे. या उन्हातून 'ड' जीवनसत्त्वाचा देखील पुरवठा होतो.- जनावरांना दैनंदिन शारीरिक क्रिया व्यवस्थितपणे होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी पाजावे.- पावसाळ्यात वाढीस लागलेल्या जनावरांना पोषक वातावरण, हिरवा चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात ती धष्टपुष्ट होतात. या काळात जनावरांची क्षय, सांसर्गिक गर्भपातविषयक तपासणी करावी.- हिवाळ्यात जनावरे माजावर येतात का, याकडे लक्ष द्यावे. जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे याचे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात का, निरीक्षण दररोज करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन करावे. जनावरांकडे लक्ष ठेवूनही त्यांचा माज लक्षात न आल्यास अशा गाई, म्हशींची पशू वैद्यकाकडून आरोग्य तपासणी करावी.- या काळात गोठा जास्त धुऊ नये, मलमुत्राचा निचरा तत्काळ करावा.- हिवाळ्यात जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीर उबदार ठेवावे लागते. याकरिता जनावरांच्या शरीरातून जास्त प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. यासाठी जनावराला जास्तीचा खुराक द्यावा लागतो. या ऊर्जेचा व्यय भरून काढण्यासाठी नेहमीच्या खुराकापेक्षा ५ ते १० टक्के जास्त प्रमाणात खुराक जनावराला द्यावा. यासोबतच योग्य मात्रेत खनिज क्षारांचा पुरवठा करावा. या काळात शिफारशीत मात्रेमध्ये मिठाचा वापर करणे उपयुक्त ठरते. याशिवाय उपलब्धतेनुसार योग्य प्रमाणात हिरवा चारा, बरसीम जनावरांना द्यावा.- दुभत्या जनावरांना दूध उत्पादन व दैनंदिन शारीरिक गरज भागविणे या दोन उद्देशांसाठी पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना जास्तीचा शिफारशी प्रमाणे आहार द्यावा. त्याचप्रमाणे गाभण जनावरांनादेखील गर्भाच्या विकासासाठी शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात आहाराची गरज असते.- बहुतेक जनावरे विशेषतः म्हशी हिवाळ्यात माजावर येतात. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या कळपातील जनावरांवर लक्ष ठेवावे. म्हशींमध्ये मुका माज आढळून येतो, जो की लवकर लक्षात येत नाही. यासाठी म्हशींच्या माजाकडे विशेष लक्ष द्यावे. माजावर आलेल्या जनावरांना नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करावे.- हिवाळ्यामध्ये गोचिड, पिसवा, खरजेचे किडे यांसारख्या बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव होतो. हे बाह्य परजीवी जनावरांचे रक्तशोषण करतात. यामुळे जनावरांमध्ये पोषक द्रव्यांची कमतरता व रक्तअल्पता होते. याशिवाय हे परजीवी विविध प्रकारचे रोगजंतू वाहून नेतात. त्यामुळे रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये पसरतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपया करावे.- बाह्य परजीवींपासून बचाव करण्यासाठी जनावरांना खरारा करावा. यामुळे शरीरावरील बाह्य परजीवी गळून पडतात. त्वचा चमकदार दिसते. गोठ्याच्या फटीत हे बाह्य परजीवी लपून बसतात. त्यामुळे गोठ्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिफारशीत गोचिडनाशकांची फवारणी करावी. या वेळी गोठ्यात जनावरे नसावीत.पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्यामुळे झालेले पोटातील परजीवी कमी करण्यासाठी जंतनाशक औषधांची मात्रा जनावरांना हिवाळ्याच्या सुरवातीस द्यावी.- वासरांना हिवाळ्यात उबदार ठिकाणी ठेवावे. थंडीचा परिणाम बघून दोहणाऱ्या व चरण्याच्या वेळेत बदल करावा.

संशोधन प्रकल्प प्रमुखपशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागक्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीदूध