Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्याल्यानंतर ९० दिवसात म्हैशी पुन्हा गाभण राहण्यासाठी कसे कराल व्यवस्थापन; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:39 IST

मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी किंवा गावठी म्हैशीनीं १४ ते १५ महिन्यात एक वेत दिले पाहिजे. व्याल्यानंतर ९० दिवसात पुन्हा गाभण राहिल्या पाहिजेत हे पशुपालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

अलीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुऱ्हा, मेहसाणा म्हशींचे गोठे वाढायला लागलेत. तात्काळ दूधव्यवसाय सुरू व्हावा चार पैसे मिळावेत म्हणून मोठ्या प्रमाणात बाहेरून मुऱ्हा, मेहसाणा म्हशी पशुपालक खरेदी करतात.

मग कालांतराने त्या म्हशी वेळेवर गाभण राहत नाहीत अशी तक्रार सुरू करतात हे वास्तव आहे. मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी किंवा गावठी म्हैशीनीं १४ ते १५ महिन्यात एक वेत दिले पाहिजे.

व्याल्यानंतर ९० दिवसात पुन्हा गाभण राहिल्या पाहिजेत हे पशुपालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. पण तसे होत नाही. त्याची कारणे देखील तसीच आहेत.

म्हैशीच्या प्रजननासाठी थंडी महत्वाची- म्हैशीचे वैरण, खाद्य आणि व्यवस्थापनाकडे फार काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.- आता हिवाळा सुरू झाला आहे. हा ऋतु म्हैशीच्या प्रजननासाठी खूप पोषक असतो.- त्यासाठी हिवाळ्यात पशुपालकांनी सजग राहून आपल्या गोठ्यातील जास्तीत जास्त म्हैशी कशा गाभण राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.- कमी तापमान, मुबलक हिरवा चारा व पाण्याची उपलब्धता, थंडी यामुळे म्हशीचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादन वाढते.- त्यामुळे पशुपालक पशुखाद्यावर खर्च करतो. त्यामुळे म्हैशीचे माजाचे चक्र व्यवस्थित सुरू राहते.- गरज आहे ती माज ओळखण्याची आणि योग्य पशुवैद्यकीय तज्ञाकडून कृत्रिम वेतन करून घेण्याची.म्हैशीच्या माज कसा ओळखावा?१) दररोज सकाळ संध्याकाळ गोठ्यात चक्कर मारून कोणती म्हैस माजावर आहे ते पहाणे गरजेचे आहे.२) म्हशीमध्ये ऋतुचक्रानुसार माजाची लक्षणे दाखवली जातात.३) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात माजाची लक्षणे तीव्र असतात.४) साधारण पहाटेच्या वेळी म्हशी माजावर येतात.५) तीस ते चाळीस टक्के म्हशी सायंकाळी चार नंतर देखील माजाची लक्षणे दाखवतात.६) योनीतून चिकट पारदर्शक असा सोट पडतो.७) मुऱ्हा, मेहसाणा म्हशीमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते व गावठी म्हशी त्याचे प्रमाण थोडे कमी असते.८) अनेक वेळा माजावरील म्हशी ओरडतात.९) निरन सुजते. त्यावरील सुरकुत्या निघून जातात. आतील त्वचा लाल व ओलसर दिसते.१०) चारा, पाणी, खाद्य खाण्याकडे लक्ष नसते. अस्वस्थ असतात.११) मुख्य म्हणजे माजावरील म्हशीचे दुधाचे उत्पादन घटते. त्याचवेळी फॅट देखील कमी लागते.१२) वारंवार लघवी करतात. शेपूट वारंवार बाजूला घेतली जाते.१३) पाठीवर थाप मारली असता शरीर ताणून उभे राहतात.१४) वेळीअवेळी पान्हा घातला जातो. गावठी म्हशीचे सड ताठरतात.

या सर्व लक्षणांचा सूक्ष्म अभ्यास करून प्रत्येक पशुपालकाने आपल्या गोठ्यातील म्हशीचा माज ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.

अशा प्रकारे हिवाळ्यात माजावर आलेली म्हैस तज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य वेळी कृत्रिम वेतन करून घ्यावे. त्याची नोंद आपल्या नोंदवहीत करावी.

याचा अर्थ उन्हाळा पावसाळा या ऋतूत म्हशी माजावर येत नाहीत असे नाही. इतर ऋतूत देखील म्हैशी माज दाखवतात. लक्षणे खूप सौम्य असतात. अनेक वेळा मुका माज असतो.

एकूण वातावरण, आहार यामुळे माजाची लक्षणे तीव्र नसू शकतात. त्यामुळे पशुपालकांना माज ओळखणे थोडे अवघड जाते. पण चाणाक्ष पशुपालक सातत्याने केलेल्या निरीक्षणातून माज ओळखू शकतो.

आपला गोठ्याची प्रजनन क्षमता वाढवून योग्य वेळी म्हैशी गाभण राहतील याची काळजी घेतो. तर अशा या पोषक हिवाळ्याचा फायदा सर्व पशुपालकांनी करून घ्यावा इतकच.

- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधव्यवसायदूध पुरवठामहाराष्ट्रशेतकरी