Join us

पशुवैद्यकीय दवाखान्याचे कामकाज कसे चालते आणि तिथे कोणत्या सेवा मिळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:12 IST

सांगली जिल्ह्यातील एकूण १५७ पशुवैद्यकिय संस्था, शासकीय तसेच सहकारी दूध संघामार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. सोबतीला जवळजवळ १६०० ते १७०० खाजगी सेवा दाते आपापल्या कुवतीनुसार पशुवैद्यकीय सेवा पुरवतात.

सांगली जिल्ह्यातील एकूण १५७ पशुवैद्यकिय संस्था, शासकीय तसेच सहकारी दूध संघामार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. सोबतीला जवळजवळ १६०० ते १७०० खाजगी सेवा दाते आपापल्या कुवतीनुसार पशुवैद्यकीय सेवा पुरवतात.

जिल्ह्यातील एकूण १५३ पशुवैद्यकीय दवाखान्यापैकी जवळजवळ ९०% संस्थांना स्वतःची इमारत आहे. पूर्वी हे सर्व दवाखाने खाजगी भाड्याच्या जागेत, ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत असत. त्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत असे. पशुपालकांना देखील अशा ठिकाणी दवाखान्यात आपली जनावरे घेऊन जाणं म्हणजे एक दिव्य काम असे. पण आता सुसज्ज इमारती मधून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज चालते.

पूर्वी या दवाखान्याचे कामकाज दोन सत्रात सुरू असायचे सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते ६ ऋतुमानानुसार काही महिन्यात ७ ते १ व दुपारी ३ ते ५. मध्यंतरीच्या नवीन आदेशानुसार आता दवाखान्याचे कामकाज हे सकाळी ९ ते ४.३० पर्यंत सलग सुरू राहते. पूर्वी दवाखान्यातील कामकाज उरकून दुपारच्या वेळेत पशुपालकांच्या घरी जाऊन सेवा देता येत होती. आज काल पशुपालकांना देखील वेळ नसतो, दवाखान्यात जनावरे आणण्यासाठी आता सहसा कोणी तयार होत नाही. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाची घरपोच सेवा मिळावी ही अपेक्षा असते.

सध्या मुळातच एकूण पशुधन विकास अधिकारी यांच्या ४० व पशुधन पर्यवेक्षक यांची २८ जागा रिक्त असल्यामुळे मोठा ताण पशुसंवर्धन विभागावर आहे असे त्यांच्याशी चर्चा करताना जाणवते. या दवाखान्यातून उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर उपचार, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, लसीकरण, नमुने तपासणी यासह नियमित पशुपालकांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे लागते.

अधिक वाचा: पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना कशी मिळते सेवा

त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांसाठी मार्गदर्शन करणे, त्याची पडताळणी करणे सोबत प्रत्येक पशुपालकाचे त्याच्या पशुधनाच्या कानात बारा अंकी बिल्ला मारून त्यांची 'भारत पशुधन ॲप' सारख्या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करणे इत्यादी कामकाज करावे लागते. सोबत जमा होणारे सेवाशुल्क त्याची नोंद ठेवणे, बँकेत भरणे, नियमित लेखापरीक्षण करून घेणे यासारखी कामे दवाखान्यातून होत असतात. अशा काही गैरतांत्रिक कामासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे प्रत्येक बाब ही संबंधित दवाखानाच्या संस्थाप्रमुखांनाच करावी लागते. त्यामुळे पशुपालकाच्या पशुधनाची आरोग्य सेवा मागे पडते.

त्यातून मग वेळेत सर्व कामकाज उरकत नसल्यामुळे पशुपालक व संस्थाप्रमुख यांच्यात उगाचच कटुता निर्माण होते असे अनेक पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. सहकारी, खाजगी दूध संघांची पशुवैद्यकीय सेवा ही त्यांच्या सभासदापुरतीच मर्यादित असते. इतर शेळ्या, मेंढ्या, वराह, कुकुटपक्षी, श्वान, मांजर यासह बैलगाडी शर्यती व न्याय पशुवैद्यक स्थिती यांची सर्व जबाबदारी ही शासकीय पशुवैद्यकीय संस्थावर पडते हे देखील तितकेच खरे.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

टॅग्स :दुग्धव्यवसायगायकुत्राराज्य सरकारसरकारशेतकरी