Join us

बैलांना शिंगाचा कॅन्सर कसा होतो? काय आहेत त्याची लक्षणे? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:39 IST

Bullock Horn Cancer शिंगे म्हणजेच बैलाचं एक महत्त्वाचं अंग आहे. बैलाची एक गंभीर समस्या म्हणजेच शिंगाचा कॅन्सर आहे. शिंगाचा कॅन्सर, प्रादुर्भाव, कारणे, लक्षणे याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

आधुनिक कृषी व विज्ञान तंत्रज्ञानाने इतकी प्रगती करत असताना देखील भारतीय ग्रामीण शेतकरी आजही कृषी विषयक अवजड कामासाठी बैलशक्ती हाच एक पर्याय आहे.

शिंगे म्हणजेच बैलाचं एक महत्त्वाचं अंग आहे. बैलाची एक गंभीर समस्या म्हणजेच शिंगाचा कॅन्सर आहे. शिंगाचा कॅन्सर, प्रादुर्भाव, कारणे, लक्षणे याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

रोगाची मुख्य कारणे◼️ शेतात उन्हात काम करीत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणामुळे शिंगाचा कर्करोग होतो.◼️ शेती कामासाठी जुंपलेल्या बैलास लाकडी अथवा लोखंडी ५ ते १० किलो वजनाच्या जूमुळे शिंगाच्या पाठीमागच्या बाजूला मानेवर सतत होणाऱ्या घर्षणक्रियेमुळे काही विषाणू या रोगासाठी कारणीभूत ठरतात. वयस्कर जनावरांस हा रोग जास्त प्रमाणात होतो.◼️ शिंगे आकर्षक दिसण्यासाठी व वय लपवण्यासाठी आणि बाजारात जास्त किंमत मिळण्यासाठी तासली जातात. यामुळे शिंगे मृदू होऊन शिंगाला इजा होऊन कर्करोग होऊ शकतो.◼️ शिंगाचा बाहेरील भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतील भाग पोकळ असून, अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. जनावरांच्या शिंगाच्या आतील पोकळ भागात रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडासही तो पसरतो.

लक्षणे◼️ शिंगास खाज सुटून वेदना होतात. जनावर सतत डोके हलवत असते. ◼️ जनावर झाडास शिंग घासते अथवा टकरा मारत असते. ◼️ कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण (फोरसेप्स) मारून पाहिल्यावर त्यातून भदभद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही कारण तो आतून टणक असतो.◼️ शिंगाला कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो.◼️ कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते अथवा वाकडे होते.◼️ रोगाचे प्रमाण जास्त असल्यास शिंग हलते.◼️ शिंग तुटल्यावर त्याठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते. रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जिवाणूचा प्रादुर्भाव होतो.

रोगाचा प्रसार असा ओळखावा◼️ शिंगाचा कर्करोग हा प्रामुख्याने लक्षणावरून उदा. शिंग वाकडे होणे, हलणे, नाकातून येणारा साय, शिंग घासणे, शिंग दुभंगणे आदीवरून केले जाते.◼️ जनावराच्या शिंगाच्या 'क्ष' किरण तपासणीत शिंगाच्या आतील पोकळ भागात पेशींची लवचिक वाढ दिसते. जी कर्करोग दर्शवते. रोगाचे निदान प्रयोगशाळेत कर्करोगाच्या वाढीच्या तपासणीवरून केले जाते.

उपचार◼️ लक्षणे दिसताच शिंगावर शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढले जाते.◼️ या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.

कर्करोग कसा टाळावा◼️ कडक उन्हात बैलांना काम देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी.◼️ प्रखर ऊन होणाच्या अगोदर अथवा प्रखर ऊन कमी झाल्यावर शेतातील काम करावे.◼️ शिंगे तासू नये, शिंगांना वार्निश (रसायनयुक्त) सारखे रंग लावू नये.◼️ बैलांना शेतात काम करताना मानेवरचे जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचे आवरण जूवर लावावे.◼️ शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावे.

- डॉ. जी. एस. खांडेकरपशुशल्य चिकित्सक व क्ष-किरण विभाग प्रमुख- डॉ. सय्यद मोहम्मद अलीपशुशल्य चिकित्सक पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई

अधिक वाचा: उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर

टॅग्स :कर्करोगदुग्धव्यवसायशेतकरीशेतीबैलगाडी शर्यत