Join us

Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:03 IST

गोचीड हा एक रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो गाई म्हशीच्या अंगावर राहतो. आपल्या राज्यात सुमारे ८७% जनावरांच्या अंगावर गोचीड असल्याचे आढळून आले आहे.

गोचीड हा एक रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो गाई म्हशीच्या अंगावर राहतो. आपल्या राज्यात सुमारे ८७% जनावरांच्या अंगावर गोचीड असल्याचे आढळून आले आहे.

देशात एकूण १६० प्रकारचे गोचीड आढळून येतात. त्यांच्यामुळे गोचीडताप, जनावरांच्या मध्ये अशक्तपणा, जखमा, टिक पॅरालिसिस (लकवा) होतो. त्यातून मग दूध, मांस उत्पादन घटते.

गोचीड तापात योग्य वेळी योग्य उपचार योग्य पशुवैद्यकाकडून मिळाले नाहीत तर मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे दगावतात. पशुपालकांना कायम भेडसावणारा प्रश्न म्हणजे गोचीड नियंत्रण! कारणं देखील तशीच आहेत.

एकाच वेळी गोचीड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न होत नाहीत. वारंवार एकच रासायनिक औषध वापरल्यामुळे पुढे पुढे त्या औषधाला गोचीड दात देत नाहीत. काही उपाय खर्चिक असल्यामुळे पशुपालक त्याकडे दुर्लक्ष करतात.

गोचीडाच्या जीवन चक्राचा विचार करून गोचीड नियंत्रणासाठी योग्य पद्धत वापरली जात नाही. या सर्व कारणामुळे गोचीड नियंत्रण करणे पशुपालकांना अवघड जाते हे मात्र खरं आहे. पण एक गोष्ट नक्की आपल्याला गोचीड नियंत्रण हे करणे खूप आवश्यक आहे.

गोचीडांचा प्रसार कसा होतो?▪️एकावेळी गोचीड १०० ते १५०० अंडी घालतात.▪️पिल्लं जनावरांना चिकटतात व रक्त पितात.▪️गोठ्यात जनावरांच्या शरीरावर फक्त पंधरा ते वीस टक्के गोचीड असतात.▪️बाकी सर्व गोचीड हे गोठ्याच्या आसपास खाच खळग्यात, लाकडाच्या फटीत, दगडाखाली, भिंतीच्या भेगा या ठिकाणी असतात.

गोचीड नियंत्रण कसे कराल?१) गोचीड नियंत्रण करताना फक्त शरीरावरील गोचीड हटवून उपयोग नाही तर गोठ्यातील गोचीडावर औषध फवारणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे.२) औषध वापरताना एकच औषध सातत्याने न वापरता दर दोन-तीन महिन्यांनी औषधात बदल करावा.३) अंगावर फवारताना व गोट्यात फवारताना त्याचे प्रमाण वेगवेगळे असावे. गोठ्यात फवारताना अंगावरील प्रमाणापेक्षा दुप्पट असावे.४) अंगावर औषध फवारताना जनावरांच्या नाका तोंडात औषध जाणार नाही याची काळजी घ्यावी.५) गोचीडाची अंडी व लहान अवस्थेतील गोचीड हे फ्लेमगन ने जाळून टाकावे किंवा गोडेतेलाचा टेंबा करून त्याने गोचीडाची अंडी जाळून घ्यावीत. हा उपाय खूपच परिणामकारक ठरतो.६) जाळून अंडी नष्ट केल्यामुळे पुढील जीवन चक्र संपुष्टात येऊन योग्य नियंत्रण ठरू शकते. त्यासाठी आठवड्याच्या अंतराने तीन वेळा ही उपाययोजना करावी.७) गोचीड उपाशीपोटी खूप दिवस राहू शकतात. सोबतच निसर्गात त्यांचे शत्रू खूप कमी आहेत.८) आजकाल आपण जनावरे कुरणात घेऊन जात नाही. पण जर जात असू तर मात्र चराऊ कुरणाची नांगरणी नियमित केल्यास अंडी व पिल्ले सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात.९) अनेक वेळा जैविक पद्धतीत करंज तेल १० मिली, नीम तेल १० मिली व २० ग्रॅम साबणाचा चुरा एक लिटर पाण्यात मिसळून फवारू शकतो.१०) मेटारायझियम नावांच्या बुरशीजन्य कीटकनाशकाचा  वापर करून देखील गोचीड नियंत्रण करता येते. त्यासाठी मेटारायझियम पावडर पाच ग्रॅम, पाच मिली दूध व एक लिटर पाणी एकत्र मिसळून फवारून घ्यावे.

सोबत इतर औषधाचा वापर देखील पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून कोचीड नियंत्रण करावे. व आपले बहुमोल पशुधन त्यांच्यापासून सुरक्षित ठेवावे.

- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: जनावरांना ऊस वाढे खायला देणं कितपत योग्य; त्याचे परिणाम काय? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधआरोग्यव्यवसायकीड व रोग नियंत्रण